अमेरिकन गॉड्स: एक उदासीन सुंदरता

नील गेमन यांचे “अमेरिकन गॉड्स ” हे पुस्तक वाचणे हा एक विचित्र अनुभव आहे. पुस्तकाची भाषा साधी पण सुंदर आहे. मात्र लेखकाने आपल्या भाषाकौश्ल्याने पुस्तकाल एक उदास झाक दिली आहे जी पहिल्या पानापासून आपल्याला जाणवायला लागते. कथानकही काहीसे विचित्र, पण इंटरेस्टिंग वाटते.

शॅडो नामक कथानायक तुरुंगातून सुटतो तिथून कथानकाची सुरुवात होते. त्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या शॅडोला “वेडनस्डे” नामक एक रहस्यमय मनुष्य आपला बॉडीगार्ड म्हणून नोकरी देऊ करतो. मात्र काही वेळाने सर्व काही दिसते तसे नाही असे शेडोच्या लक्षात येते. हा “वेडनस्डे” म्हणजे प्रत्यक्षात नॉर्डिक पुराणातील देव “ओडिन” आहे. माणसांचा त्यांच्यावरील विश्वास कमी झाल्यामुळे आदिम काळापासून चालत आलेल्या देवतांची ताकद आता नव्या जमान्यात कमी होऊ लागलेली आहे. “मिस्टर इंटरनेट” “ मिस्टर टेलेव्हिजन” अशा नव्या गोष्टीना देवत्व प्राप्त झाले आहे.  हे नवे देव जुन्या देवताना नष्ट करायला उठले आहेत, आणि त्याविरोधात लढण्यासाठी ओडिन विविध प्राचीन देवतांची आपल्या पक्षात भारती करतो आहे. या कामी आपल्याला मदत करण्याचे काम देखील ओडिन शेडोवर सोपवतो. मग अमेरिकाभर भ्रमंती करता करता आजच्या जगात रूप बदलून राहणाऱ्या विविध प्राचीन  देवताना शॅडो भेटतो आणि त्याला अजून विविध शोध लागत जातात

हे सारे देव विविध देशांतील स्थलांतरित लोकांनी अमेरिकेत आपल्या परंपरा जतन करण्याचे प्रतत्न केल्याने अमेरिकेत अवतरले. एकीकडे हे शेडोचे कथानक चालू असताना हे स्थलांतरित अमेरिकेत कसे आले, त्यांचा इतिहास, धर्म, परंपरा याचीही माहिती छोट्या छोट्या  उपकथानकांमधून  उलगडत जाते. या सर्व उपकाथानाकांमध्ये आफ्रिकेतील त्याच्याच मामाने फसवून अमेरिकन व्यापार्यांना गुलाम म्हणून विकलेल्या भावाबहिणीची कथा फार अस्वस्थ करून जाते.

इथे शेडोची भ्रमंती चालू असताना वाटेत “नवे देव” त्याचे अपहरण करतात. त्यांच्या तावडीतून कसाबसा सुटून आल्यावर ओडीन त्याला   लेकसाईड नामक एका छोट्या शहरात लपवून ठेवतो. या शहराच्या सभोवताली परिसरात गरिबी आणि बेकारी पसरलेली आहे मात्र लेकसाईड शहरात  सर्वकाही शांत आणि आलबेल आहे.  पण हे चित्र दिसते तसे नाही अशी कुणकुण शेडोला लागते. या शहरात “हाईनझलमेन” नामक एक जर्मन पिशाच्च आहे. या शहरात त्याने फसवी भरभराट निर्माण केलेली आहे आणि त्या बदल्यात तो हळूच शहरातील लहान मुलांचे अपहरण करून बळी घेतो आहे.

पुढील मुक्कामी शॅडो पाहतो कि प्राचीन इजिप्शिअन देव अनुबिस, बास्ट आणि थोथ हे तिघे आता पैसे कमावण्यासाठी एक स्मशानभूमी चालवत आहेत, झेर्नबॉग या रशियन लोककथेतील शक्तिशाली पत्रावर लोहार म्हणून काम करण्याची पाळी आली आहे, एक अरब जीन टेक्सी ड्रायव्हर बनला आहे अशा प्रकारे जुने देव हळू हळू विस्मृतीत चालले आहेत.

मात्र कथानाक चांगले असले तरी ते लेखकाने बरेच लांबवले आहे. भाषा समृद्ध असली तरी कथा अत्यंत हळू पुढे सरकते. हे पुस्तक वाचायला फार वेळ आणि पेशन्स हवे. या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे नसल्यास या पुस्तकाच्या वाटेला जाऊ नये. सध्या सरळ आणि सुखी साहित्याची आवड असणाऱ्यांनाहि हे पुस्तक आवडणार नाही. पण जर त्याच्यावरील उदासीच्या मळभाचा  तुम्हाला त्रास होत नसेल तर अमेरिकन गॉडस वाचून पाहण्यासारखे आहे.

अमेरिकन गॉड्स
लेखक: नील गेमन
प्रकाशक हेडलाईन बुक पब्लिशिंग
पाने: ७३६
किंमत: हार्डकव्हर: ७१९ रुपये , पेपरबॅक : २३३ रुपये  किंडल: २२१ रुपये

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी