सिंड्रेला

समुद्राच्या लाटा तिच्या नाजूक पावलांशी लडिवाळपणे घोटाळत होत्या. गोरे गोरे गाल उन्हानं गुलाबागत लाल झलेले, चेहरा आनंदानं फुललेला, पाणीदार घारे डोळे कुठेतरी शून्यात हरवलेले, अशी सुंदर, सुबक मूर्तीसारखी किनाऱ्यावर उभी असलेली ती मुलगी अचानक गुणगुणायला लागली.

“वाळूच्या कणात अन तरुणांच्या कानात
भरलंय वेड्यागत वारं.
पण सागराच्या अथांग निळ्याशार शांततेत...

हेलो?”

मोबाईल फोनच्या खणखणाटानं तिला दिवास्वप्नातून खाड्कन जमिनीवर आणलं

“हो आलेच मी. तू डील क्लोज कर. मी पोचतेच.” तिच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात लुप्त झाला
“चाललीस का सोडून?” मी विचारलं “
“हो. गेलं पाहिजे मला.”
“तुला माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय.”
माझा चढलेला आवाज ऐकून ती केवळ मंद हसली आणि प्रत्युत्तरादाखल एक अवाक्षरही न बोलता तोंड वळवून चालायला लागली.
“अगं, जाता जाता ती कवितेची शेवटची ओळ तरी पूर्ण कर!”
“ ...पण सागराच्या अथांग निळ्याशार शांततेत
   लपलंय वादळ खरं.”
जाता जाता सुंदर शब्दांची उधळण करत ढगांच्या आडून हळूच काही क्षणापुरतं हसणाऱ्या ताऱ्याप्रमाणे ती पुन्हा अदृश्य झाली.

तिचं हे कायम असंच असतं.

या सुंदरीचं लावण्य पाहणाऱ्याच्या हृदयावर राज्य करतं; आणि तिच्या कविता ऐकणाऱ्याच्या मनावर. पण अशा मैफलीत रंग भरायला लागतो न लागतो तोच ती अचानक गायब होते, श्रोत्यांना तहानलेलंच ठेवून. तिच्या गैरहजेरीतही त्या कविता श्रोत्याच्या मनात रुंजी घालत राहतात. अगदी त्या राजवाड्याच्या पायरीवर उरलेल्या नाजूक काचेच्या बुटासारख्या. भरलेली मैफल अर्धीच सोडून जाण्याच्या तिच्या या सवयीमुळेच माझ्या विश्वात तिचं टोपणनाव पडलंय “सिंड्रेला”.

तिचं हे असं वागणं आणि तिच्या-माझ्या भांडणाचं कारण आहे तिची नोकरी. संगीत, साहित्य, भाषा, मानसशास्त्र अशा सर्जनशील गोष्टींमध्ये रुची असूनही सिंड्रेला नोकरी करते ती सेल्स क्षेत्रात.
या नोकरीने अंतर्मुख, संवेदनशील सिंड्रेलाची केलेली परिस्थिती तर अजूनच अस्वस्थ करणारी आहे.
तिचं मन इतकं संवेदनशील आहे कि जर ती खूप खूष किंवा खूप दुःखी झाली तर तिच्या तोंडून उत्स्फूर्तपणे कविता बाहेर पडतात.

असं म्हणतात की एकदा फोनवरील सिंड्रेलाच्या मधाळ आवाजानं घायाळ झालेल्या कोणीतरी तिचं नाव आणि पत्ता विचारला, तर तिनं त्याला खालीलप्रमाणे उत्तर दिलं

“तुमची सगळी कामं होतील
जेव्हा तुम्ही आदेश द्याल,
मी कोण? केवळ एक सावली
एक स्वप्न, पडद्यामागील जादुगार !”

या अशा तिच्या कवितांचे असंख्य चहाते आहेत. पण या बाईंनी आपली एकही कविता कधी लिहून ठेवलेली नाही. कारण? नोकरीमुळे वेळ मिळत नाही.

मुळात सिंड्रेला अशी व्यस्त, ‘आउट-गोइंग’ मुलगी नव्हती. विद्यापीठात इंग्लिश क्रिएटिव रायटिंगच्या वर्गात ती माझी क्लासमेट होती. दूर कोपऱ्यात गप्प बसायची. तिचे मिश्कील घारे डोळे जणू दुसऱ्याच्या अंतरंगालाच भिडायचे. कधी खोल विचारात गढून गेली कि गोरा गोरा चेहरा सफरचंदागत लाल व्हायचा. कधी स्वतःशीच हसली की तिचे दात साफेदीसाठी तिच्या गळ्यातल्या कंठ्यातल्या मोत्यांशी स्पर्धा करायचे. किंचित करडी छटा असलेले केस लाटांसारखे पाठीवर अलगद रूळायचे. या बहुलीपायी माझं लक्ष त्या इंग्लिश क्लास मध्ये कधीच धड लागलं नाही.

अशी हि सिंड्रेला एकटीच स्वतःच्याच विश्वात रममाण असायची. लोकांकडे मोकळेपणाने बोलणं तिला फारसं जमायचं नाही. मग ती मानसशास्त्राच्या पुस्तकांमागे किंवा कुठल्यातरी परीकथा आणि साहसकथांच्या कादंबरीमागे लपून बसायची. गोष्टींचं भारी वेड होतं तिला आणि तशाच सुंदर रीतीने गोष्टी सांगायची हातोटी देखील. गोष्टी आणि कवितांचा वापर मानसशास्त्रात डिप्रेशनवर काबू मिळवण्यासाठी करता येईल का यावर पुढे संशोधन करायचं तिचं स्वप्न होतं. मात्र संशोधन म्हटलं कि विविध लोकांना भेटावं लागतं, बोलाव लागतं; तिचा ‘रीसर्व्ड’ स्वभाव पाहता हे तिचाकडे कसं जमेल असा प्रश्न मला पडायचा. कविता आणि गोष्टींमध्ये आमची रुची जुळत होती तरी क्लासमध्ये मला केवळ “हाय” म्हणायचं धारिष्ट्य जमवायला तिला दोन महिने लागले.

अशी हि लाजरीबुजरी परीराणी जेव्हा एक वर्षानंतर माझ्या ऑफिस समोर असलेल्या मोठ्या टेलिकॉम कंपनीत सेल्स ऑफिसर म्हणून अवतरली तेव्हा मला धक्काच बसला. तिच्या या क्षेत्रात येण्यामागचं  कारण जाणून घ्यायला मी एक दिवस तिला कॉफी प्यायला बोलावलं. त्यावर पुन्हा गालांना खळ्या पाडत तिनं माझ्या तोंडावर शब्द फेकले.
“वेड्यागत पैशापाठी
पळत सुटलेत सगळे
भेटायला बोलायला वेळ नाही आता
आपले मार्ग वेगळे.”

बापरे. ते भयंकर सडेतोड शब्द माझ्या जिव्हारी लगले. “ओह, इतका खोल प्रभाव पडतो का माझ्या कवितांचा? ” माझा पडलेला चेहरा बघून सिंड्रेला म्हणाली.
“हो तर. पण तुला ज्या क्षेत्रांमध्ये ज्ञान आणि गती आहे ती सोडून इकडे भलतीकडे का कडमडते आहेस तू?” मी तिला डिवचलं.
“सांगेन कधीतरी वेळ मिळाला की.” नेहमीसारखं काहीतरी मोघम उत्तर देऊन ती पुन्हा काचेच्या दाराआड गायब झाली.

त्यानंतर सिंड्रेलाशी कधी फारशी भेट व्हायची नाही. सकाळी तिच्या ऑफिसमध्ये शिरताना ओझरती दिसायची. कधी आमच्या ऑफिसची खिडकी उघडी असली तर काचेपलिकडे बसलेली दिसायची, पण बहुतेकदा ती दिवसभर फिरतीवर असायची. संध्याकाळी बरोब्बर सहाच्या ठोक्याला कार्ड पंच करायला ती पुन्हा आली कि आम्ही जाता जाता कॉफी पीत चार वाक्य बोलायचो. माझ्या पत्रकाराच्या नोकरीत दिवसभर घोटाळे, गुन्हेगारी, आंदोलन असल्या गोष्टींशी झगडल्यावर तीन्हीसांजा सिंड्रेलाच्या सेल्समधील ग्राहकांच्या गमतीदार गोष्टी आणि कविता ऐकून सारा शीण निघून जायचा. मात्र सातचा ठोका पडला की ती कॉफीसुध्दा तिथेच टाकून सिंड्रेला बस पकडायला धावत सुटायची – ऐन रंगात आलेलं संभाषण सोडून.

ती आठवड्यातून एकदोन दिवस ओझरतीच दर्शन द्यायची; पण तरी नव्या नोकरीने सिंड्रेलाच्या तब्बेतीवर केलेला परिणाम मात्र तेवढ्या वेळातही जाणवायचा. सात-आठ महिने या कंपनीत काढल्यावर ती फार बारीक झाली होती; थकलेली वाटायला लागली होती. चेहरा ओढलेला असायचा; पाणीदार घाऱ्या स्वप्नाळू डोळ्यात आता चिंता साठलेली दिसायची. या सेल्सच्या नोकरीचा त्या संवेदनशील, भिडस्त बाहुलीवर बराच ताण पडत असावा. आपल्या मूळ स्वभावाला आणि तब्बेतीला न झेपणारे हे धंदे सोडून दे असं तिला सांगावंसं वाटायचं मला, पण तिच्या जीवनात आपण ढवळाढवळ का करावी म्हणून मी गप्प बसायचो.
माझा अंदाज एक दिवस खरा ठरला. कधीतरी अचानक तब्बेतीचं कारण देऊन सिंड्रेला ऑफिसमधून निघून गेली ती चांगली आठवडाभर उगवली नाही. चौकशी केली तेव्हा कळलं कि ती आजारी पडली होती –अतिकामामुळे; सेल्स लाईन मधला तणाव, दबाव न झेपल्यामुळे.
बऱ्याच दिवसांनी अशक्त दिसणारी सिंड्रेला पुन्हा पाटो-पणजी स्थित तिच्या कंपनीत अवतरली. आणि आम्ही नेहमीप्रमाणे संध्याकाळी कॉफीच्या टपरीवर भेटलो.

“आता पडलीस न आजारी. मी सांगत होतो, उघड्या डोळ्यांनी तुझे हाल दिसत होते, पण तरी स्वतःच्या जीवाची ओढाताण करणाऱ्या या क्षेत्रात का आलीस तू?” या क्षेत्राची आवड आणि अॅपटीट्युड काहीही नसताना ती सेल्समध्ये का आली हा प्रश्न मला कधीपासून छळत होता.
“अरे, गंमत आहे त्यामागे!” शेवटी एकदाची सिंड्रेला बोलायला लागली. “अंतर्मुखतेविषयी काही शोध लागलेत मला.”

“ही नोकरी करून?”
“हो.”
“काय शोधून काढलस तू?”
“आता कसं सांगू मी...सम्राट चंद्रगुप्त मौर्याची गोष्ट माहितीये का तुला?”
मानसशास्त्रातील सिद्धांत समजवायला देखील सुंदर गोष्टींचा उपयोग करणं हि सिंड्रेलाची एक खासियत होती. तिनं गोष्टीचं नाव काढलं म्हणजे आता काहीतरी सिरीयस सायकोलॉजिकल ज्ञान मिळणार.

“नाही.” स्वतः हिस्टरी ग्रॅज्युएट असूनही मी अज्ञानाचा आव आणला.

“असं म्हणतात की चंद्रगुप्त विषाप्रयोगास बळी पडू नये म्हणून आर्य चाणक्य रोज त्याच्या जेवणात थोडे थोडे विष घालत असत. त्यामुळे राजाला विषाची सवय झाली.”

“मग?”

“बहिर्मुख माणसं इतर माणसांच्या सहवासात खुलतात. मोठय पार्ट्या, मोठे जनसमुदाय, नव्या वाटा चोखळण, अनोळखी क्षेत्रे पालथी घालणं, स्वतःकडे लक्ष वेधून घेणं यातून त्यांना मानसिक समाधान आणि ताकद मिळते. सेल्स, पर्यटन, एच-आर, हि सगळी या लोकांची क्षेत्रे आहेत.

माझं मूळ व्यक्तिमत्व अंतर्मुख. इतरांमध्ये जास्त मिसळण्यापेक्षा शांतपणे विचार, चिंतन, मनन करणं अशा लोकांना अधिक प्रिय. अनोळखी लोक, परिसर, यावर पारखून घेतल्याशिवाय ते विश्वास ठेवत नाहीत बहिर्मुख लोकांप्रमाणे स्वतःकडे लक्ष वेधून घेणं त्यांना आवडत नाही. उलट असे समूहाच्या नजरेत आले तर ते अस्वस्थ होतात; मिटून जातात.  मला पण माणसांमध्ये जास्त मिसळता येत नाही, बोलता येत नाही, ग्रुप जितका मोठा तितकी मी हळू हळू बाजूला फेकली जाऊन मिटत जाते.”

“ओह.” अचानक माझी ट्यूब पेटली.
“ म्हणजे स्वतःच भिडस्तपणा घालवायला मुद्दाम बहिर्मुखी लोकांमध्ये वावरत होतीस तू!”

“बरोबर.”
“असले अघोरी उपाय करून कोण बदलत नसतं. बघ काय हाल झाले तुझे.”
“अरे, नाही. तिथेच तर गंमत आहे!” तिचे घारे डोळे मिश्किलपणे चमकले

“मूळ स्वभाव कोणाला बदलता येत नाही. पण अंतर्मुख लोक काही वेळा गरजेप्रमाणे आपलं वागणं तात्पुरतं बदलू शकतात. बहिर्मुख असल्याचं अगदी बेमालूम सोंग करतात ते!”
“म्हणजे अगदी सरड्यांसारखे रंगबदलू?”
“होय.”
“कसे?”

“आपल्याभोवतीचे इतर लोक कसे वागत आहेत त्याचं निरीक्षण करून आपल्या वाग्ण्याशी ते त्याची तुलना करतात आणि त्यानंतर हळूच इतरांमध्ये ‘फिट’ होण्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करतात- अगदी स्वतःच्याही नकळत! मानसशास्त्रात याला म्हणतात ‘सेल्फ मॉनिटरिंग’. या ‘सेल्फ मॉनिटरिंग स्केल’ वर जितका स्कोर जास्त तितकी ती व्यक्ती या कलेत अधिक तरबेज.”

“मग तूझा स्कोर किती आहे या स्केल वर?”

“सेल्समधला माझा अनुभव बघता जास्त नसावा” सिंड्रेलानं एकदा गोड हसून माझं हृदय घायाळ केलं आणि ती ती परत गंभीर झाली.

“पण एक गोष्ट आहे, माणूस आपल्या मूळ स्वभावाशी फार काळ प्रतारणा करू शकत नाही. काही वेळापुरतं पचून जातं हे पण फार काळ असं स्वतःशीच फटकून वागत राहिलं तर आपल्या स्वायत्त मज्जासंस्थेवर (autonomic nervous system) प्रचंड ताण येतो आणि त्यामुळे आपण अति ताणानं आजारी पडू शकतो.”

“या सगळ्या गोष्टी माही असून तू...”

“त्यावर उपाय म्हणजे अशा नाटकात काही छोटे छोटे ब्रेक्स  घेत अधून मधून आपल्या मूळ स्वभावाला वर यायची संधी देणं. आपल्या आजूबाजूला चाललेल्या सगळ्या गोंधळातून क्षणभर अलिप्त होण्यासाठी आपण काही छोट्या ‘रिस्टोरेटिव रिसोर्सेस’ तयार करू शकतो
“कसे असतात हे रिसोर्सेस?”
“काही सध्या सरळ गोष्टी. जसं की ऑफिसमध्ये एखादा तुलनेने एकांत असलेला कोपरा किंवा एक नेहमीपेक्षा थोडा जास्तच मोठा बाथरूम ब्रेक; अशा जागा किंवा इतर गोष्टी ज्या आपल्याला एकांत आणि विश्रांती देतील आणि इतरांबरोबर वाहावत जाऊ देणार नाहीत. जसं कि माझ्यासाठी असा रिसोर्स होता एक छोटीशी कविता.

दाहक अग्नीपेक्षा श्रेष्ठ
वाहत्या जलाची हळुवार माया
पुढे जाईन मी शांतपणे
अडथळ्यांची झिजवून काया.”

“व्वा! मनःशांती टिकवायला चांगली आहे हि कविता.”
“हो तर. माझी सेल्स टार्गेट्स कधीच पूर्ण व्हायची नाहीत. पण आपल्या मूळ पिंडाशी प्रामाणिक राहण्यासाठी बनवलेली हि कवितेची ढाल बॉसच्या ओरडण्याला पुरून उरायची!”

“असे जालीम उपाय माहित असूनही आजारी कशी पडलीस तू?”

“अरे, या नोकरीत मला असे ब्रेक्स घ्यायला फारसा वेळच मिळायचा नाही. काळाबरोबर ताण वाढत गेला, तब्बेत बिघडत गेली.” सिंड्रेलाच्या घड्याळात सातचा आलार्म वाजला. पण आज तिनं शांतपणे  तो बंद केला. “सोडली मी ती नोकरी.” तिचा गौरवर्णी चेहरा मुक्तीच्या आनादानं अधिकच उजळला होता. डोळ्यातली स्वप्नं पुन्हा उमलू लागली होती आणि अर्थातच खुशीत आलेली सिंड्रेला जाता जाता गुणगुणायला लागली होती:

संधी अनंत येती जाती
पळू म्हणती पैशापाठी
माझे मन अविचल, निश्चल
आपले भाग्य आपल्या हाती

बाजाराच्या चकचकाटात
प्रलोभने अनंत खुणाविती
माझी निवड शांत, सौम्य
आरोग्य, आनंद सर्वात आधी

अवतीभवती लढती सारे
स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
माझी लढाई माझ्याच मनाशी
स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी.
.................................

Comments

  1. जय, खूप छान लिहिलंयस. महामाया, सिंड्रेला, किंडल तिन्ही मस्त! तुला तुझा सूर/फॉर्म गवसलाय. आता थांबू नको. मनापासून शुभेच्छा!!!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मेडम. मागच्या वर्षभरात लिहिलेलं सगळं आता बाहेर काढतोय मी !

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

घरवापसी