ते दिन अजूनही आहेत!

गावातील बालपण, खूप सुंदर होते, ते गाव तेथील नयनरम्य निसर्ग वगैरे आता लोप पावत चालला आहे, ते दिवस आता इतिहासजमा झाले आहेत असा सूर लोक का लावतात ते मला कळत नाही. आता शहरातील जगण्यात ते दिवस गेले हे मला अजिबात पटत नाही. गावाबद्दल किंवा त्या जुन्या दिवसांबद्दल खूप चांगलं चांगलं लिहिलं जातं पण आपलं सध्याचं जीवन त्याहून सुंदर आहे असं मला मनापासून वाटतं.

माझं बालपण फोंडा, पणजी, मडगाव अशा शहरांमध्ये गेलं, आणि ते सुंदर मंतरलेले दिवस अजूनही संपलेले नाहीत. दुपारी शाळेतून घरी आलो कि आमच्या सोसायटीतील मित्रांच्या गराड्यात पत्ते आणि कॅरम खेळत दुपार निघून जायची. संध्याकाळी अर्थातच परत शाळेच्या मैदानावर फुटबॉल रंगायचा आणि रात्र टीव्ही आणि पुस्तकांच्या स्वाधीन असायची.

महाभारत, शक्तिमान, जंगलबुक, त्याचबरोबर जीआयजो, ट्रान्सफॉर्मर्स, अशी कार्टून्स, आणि फ्रेंड्स सारख्या अजरामर मालिकांनि आमचं बालपण फुलवल. आज तीच पात्र सिनेमारुपात परत समोर येताना पाहून खूप आनंद होतो. उन्हाळ्याच्या सुटीत मडगावला मावशीकडे जाऊन पु.लं. देशपांडेची बटाट्याची चाळ, विश्वास पाटलांचे पानिपत अशा कादंबऱ्या आणि हार्डी बॉयस, फेमस फाईव, आणि ग्रीक पुरांणकाथांमध्ये हरवून जायचो. कोलवा, मिरामार सारख्या समुद्रकिनारी किंवा पणजीच्या सरकारी वाचनालयात भान हरपून उनाडायचो. सकाळ सायकलवर फिरत काढल्यावर दुपारी व्हिडीओ गेम्स कपाटातून बाहेर यायच्या. पुढे काऊनटर स्ट्राईक, फिफा, सारख्या कम्प्युटर गेम्सनि जुन्या मरिओला हद्दपार केले. व्यक्तिमत्व विकास शिबीर नामक गोष्टीनेही मला बालपणात भरपूर त्रास दिला. चित्रकला, हस्तकला, इथपासून रोलर स्केटिंगपर्यंत विविध गोष्टी शिकण्याचा मी केविलवाणा प्रयत्न केला. मी तिथे का गेलो ते मला अजूनही माहित नाही आणि या गोष्टींचा उपयोग मी पुढे कधीच केला नाही. असो.

आजही ऑफिसच्या लंचटाईम मध्ये कधी कधी वाचनालयात चक्कर टाकतो. माझे सगळे मित्र अजूनही आपापली नोकरी-धंदा झाल्यावर संध्याकाळी कट्ट्यावर जमतात, सुखदुःखाच्या चार गोष्टी बोलतात,  सुट्या काढून सहलीवर जातात. बालपणीचे हिरोज सिनेमारुपात परत भेटत आहेत, प्ले स्टेशन सारख्या अद्ययावत गेमिंग कोन्सुलनी गेमिंगला नवी मजा आणली आहे. कधी रविवारी एकमेकांच्या घरी जमून क्रिकेट किंवा फुटबॉल मेचिस बघितल्या जातात, कॅरम आणि पत्ते पण अधून मधून हजेरी लावून जातात.

बदल हा घडतोच. फक्त आपल्या आयुष्यातील आनंददायी गोष्टी जपत गेलं कि जीवन छान फुलत जातं.

Comments

Popular posts from this blog

सिंड्रेला

घरवापसी