घरवापसी

गाडी आश्रमाच्या दाराशी आलेली पाहताच त्याच्या चेहेर्यावर मंद स्मित उमटले. “गुड मोर्निंग स्वामीजी...सर” त्याला आता कसे संबोधावे या प्रश्नाने ड्रायव्हर गोंधळून गेला. तो एक शब्दही न बोलता गाडीत बसला आणि  गाडीने विमानतळाचा रस्ता धरला.

इतक्या वर्षानंतर आपल्या मर्सेडीजचा मऊ सीट त्याला अधिकच उबदार वाटत होता.  गुरुदेव स्वामी अदभुतानंदांना भेटण्याच्या काही महिने आधीच त्याने मोठ्या उमेदीने ही गाडी घेतली होती. बाकी या स्वामींची वाणी मोठी रसाळ. वैराग्य आणि जनसेवा शिकविणाऱ्या स्वामींच्या शब्दांचा त्याच्यावर असा काही परिणाम झाला कि त्याने त्यांचे शिष्यत्व पत्करून संन्यास घेतला होता आणि घरदार, परिवार, अगदी कॉलेजमधील मित्रांसोबत वयाच्या विसाव्या वर्षी सुरु केलेल्या आपल्या “बूमरेंग इन्वेस्टमेंटस” या कंपनीवरही पाणी सोडले होते.

अर्थशास्त्रातील जबरदस्त प्राविण्यामुळे त्याने अल्पावधीतच फायनान्सचा बादशहा म्हणून नाव कमावले होते व कंपनी चांगली भरभराटीला आणली होती. हि कंपनी सुरु केल्यानंतर पाच वर्षांनी तो गुरुदेवांच्या, आणि त्यांच्या “अदभुत संघ” या संघटनेच्या संपर्कात आला होता व त्यापुढील तीन वर्षात त्याने संन्यास घेतला होता.

बरेच झाले. तो विचार करू लागला. होते ते चांगल्यासाठीच. तिथे संघात एक व्यक्ती म्हणून आपली खरी मुल्ये काय आहेत हे त्याला कळले. या संघटना फार धोकादायक असतात. त्या गोडगोड बोलून, प्रचार करून आधी लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात व नंतर वापरून घेतात. त्यच्याशी देखील या अदभुत संघाने तेच केले होते.

तिथे संघात त्याच्यावर संस्थेचे आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे काम सोपवण्यात आले -म्हणजे इथे पण तो तेच काम करत होता जे तो स्वतःच्या कंपनीत CEO असताना करत असे. फक्त इथे त्याला त्याचे श्रेय मिळणार नव्हते. संघटनेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ही एक निष्काम सेवा होती. आता या विचारानेच त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या.

विचार. आयडीओलॉजि. या संघाने त्याला पुनर्जन्माच्या संकल्पनेवर विश्वास ठेवायला लावायचा प्रयत्न केला होता, आणि आपले भाग्य त्या परमात्म्याचा हाती असते हि त्यांची श्रद्धाहि त्याने प्रश्न न विचारता स्वीकारावी हा त्यांचा आग्रह होता. अजिबात नाही! यू ओन्ली लिव्ह वन्स (YOLO). आणि तुम्हीच असता तुमच्या जीवनाचे शिल्पकार. बाकी या असल्या कल्पनांना भुलून लोक आपले स्वत्व आणि विचारशक्ती गहाण कशी काय टाकतात? आणि गुरु सांगतील त्यावर कोणतेही प्रश्न न विचारता विश्वास कसा काय ठेवतात?. अजिबात नाही! आपला कणा ताठ ठेवा, स्वतंत्र विचार करा. बाणेदार बना. नेमके हेच संघटनांना आवडत नाही. त्याचे पण हेच “चुकले”. त्याला स्वतःचे विचार होते, त्याच्या स्वतंत्र, वेगळ्या कल्पना होत्या. मात्र आपली कल्पना कशी चांगली आहे ते पटवून द्यायचा प्रयत्न केला तर “वरिष्ठ स्वामींचे ऐक. आपल्या अहंकारावर नियंत्रण मिळवायला शिक.” असा उलट त्यालाच दम भरण्यात आला होता. आपल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात म्हणून झगडण्यात कसला आलाय अहंकार?

मुळात डोळे झाकून दुसर्याचे ऐकणे हा मूर्खपणा आहे. प्रश्न विचारलेच पाहिजेत.

तो विमानतळावर पोचला आणि सुरक्षा तपासणीतून सहज पार पडला. त्याच्यापाशी कोणतीही चीजवस्तू नव्हती. विमान उडाले तसे त्याचेही मन भूतकाळातून उडून भविष्याचे मनसुबे रचू लागले.

गेल्या दोन वर्षातील त्याच्या अनुपस्थितीत कंपनीची प्रगती बरीच मंदावली होती. ज्यांनी त्याचसोबत मिळून या कंपनीची स्थापना केली त्या त्याच्या मित्रांमध्ये, भार्गव आणि श्रेयसमध्ये मतभेद निर्माण झाले होते.उगाच पसारा वाढवण्यापेक्षा कमी ग्राहकांना उत्तम सेवा देत संथ गतीने स्थैर्याला धक्का न लावता पुढे न्यावी असेभार्गवचे  मत होते, तर श्रेयसला मोठ्या आणि जोखमीच्या चाली खेळत झटपट पैसा बनवायचा होता. परिस्थितीपुढे हतबल होऊन मग भार्गवने त्याच्याशी संपर्क साधला होता, आणि तेव्हाच त्याचा निर्णय पक्का झाला होता.

त्यानंतर त्याने भार्गावला अजून एक वर्ष थांबायला सांगितले आणि इथे संघटनेच्या कामात स्वतःला झोकून दिले. तो सपाटून काम करत होता, लोकांना भेटत होता, बोलत होता,  पैसा खेळवत होता, आणि त्याने प्रतिप्रश्न विचारणे सोडून दिले होते. संघातील सर्वाना वाटले, बरे झाले. शेवटी त्याने आपला अहंकार जिंकला. हे उद्दाम पोर शहाणे आणि आज्ञाधारक झाले. नाही! आता हि त्याची संघटना उरली नव्हती. लोकांना भेटून, बोलून त्याने संपर्काचे एक घट्ट जाळे तयार केले होते. आर्थिक सल्ला आणि मदतीची ज्यांना गरज आहे अशा श्रीमंत लोकांची एक यादी तयार केली होती.

आता आश्रमातून निघताना त्याने केवळ हि एकाच फाईल आपल्यासोबत आणली होती.

“गुड इव्हिनिंग स्वामीजी!” विमानतळावर भार्गवने हसतहसत त्याचे स्वागत केले. खूप वर्षांनी जुन्या मित्राची भेट घेऊन त्यालाही फार आनंद झाला. “गुड इव्हिनिंग, तो माझा सेन्चुरियन हॉटेलमधला सूट अजून बुक केलेला आहे का?”

“हो तर” भार्गव उत्तरला “महत्वाच्या बिझनेस मिटींग्ससाठी तो कायम बुक केलेला असतो”.
“चाल मग.आधी तिथे जाऊ.” तो म्हणाला. त्याग आणि  शरणागतीचे प्रतिक असलेली हि भगवी वस्त्रे त्याला लवकरात लवकर उतरवायची होती. तो आयुष्यात कोणाचीही गुलामी करणार नव्हता-देवाची सुद्धा.

म्हणूनच आता त्याने  आरामात, स्वतःला हवा तसा वेळ घेत आपल्या मिशा अन दाढी काढली, एकेक करत सगळ्या रुद्राक्षाच्या माला आणि भगवी वस्त्रे उतारली, अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा उत्तम अरमानी सूट घातला, आपले आवडते रोलेक्स घड्याळ मनगटाला बांधले, आणि अद्ययावत नवीन मोबाईलहाताच्या मुठीत आवळत त्याच्या साम्राज्यावरची त्याची पकड, शिस्त आणि दरारा अधोरेखित करणारे ते शब्द पुन्हा उच्चारले

“ My name is Aditya Singh. And I am the CEO.”

शेळीचे कातडे फेकून देऊन सिंह परत आला होता.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला