रिच डेड पुअर डेड: आर्थिक नियोजनाचा श्रीगणेशा

रिच डेड पुअर डेड हे रोबर्ट कियोसाकी लिखित प्रसिध्द पुस्तक काही दिवसांपूर्वीच वाचनात आले. गरीब व श्रीमंत लोकांच्या आर्थिक नियोजनात कसा फरक असतो व विविध आर्थिक स्तरातील लोकांची पैशाकडे पाहण्याची दृष्टी कशी असते याचे विश्लेषण करत उत्तम आर्थिक नियोजनाद्वारे कसे श्रीमंत होता येईल त्याचा मार्ग दाखवणारे हे पुस्तक आहे.

बालपणापासून खूप श्रीमंत होण्याची इच्छा असलेले लेखक वयाच्या नवव्या वर्षी आपल्या वडिलांना श्रीमंत होण्याचा उपाय विचारतात. त्यावर हा उपाय आपल्यापेक्षा माईक नामक बालमित्राच्या वडिलांना माहित असल्याचे सांगून लेखकाचे वडील त्याला त्यांच्याकडे पाठवतात. इथून व्यक्तिगत अनुभवाच्या सुंदर गोष्टी सांगत लेखक माईकच्या वडिलांकडून शिकलेल्या आर्थिक नियोजनाच्या युक्त्या उलगडत जातात.

बेसिक बेलंस शीटचे अर्थातच उत्पन्न व खर्च असे दोन भाग असतात. पण त्याचबरोबर आपण ज्या वस्तू किंवा गोष्टी विकत घेतो त्यांची ‘एसेट’ व ‘लाएबिलिटी’ अशा दोन वर्गात वाटणी होते.  ‘एसेट’  म्हणजे अशा  गोष्टी त्यातून आपल्याला अर्थप्राप्ती होईल (जसे कि शेअर, म्युचुअल फंड, बॉंडस,  जमीन, इत्यादी) ‘लाएबिलिटी’ म्हणजे अशा वस्तू किंवा गोष्टी ज्यातून आपल्यालाआर्थिक प्राप्ती होत नाही, उलट आपला पैसा त्यावर खर्च होत राहतो (जसे कि टीव्ही, एसी अशा चैनीच्या वस्तू)

गरीब माणसाला रोजच्या जगण्याचीच इतकी मारामार असते कि त्याच्याकडे एसेट व लाएबिलिटी दोन्ही नसतात. याउलट मध्यमवर्गीय माणसाला चांगला पगार असतो, पण तो कर्ज काढून चैनीच्या वस्तू विकत घेतो. त्यामुळे त्याचे बरेचसे उत्पन्न कर्जाचे हफ्ते फेडण्यात संपते व नंतर गुंतवणूक करण्यासाठी हाती शिल्लक काहीही उरत नाही. त्याच्याकडे एसेट पेक्षा ‘लाएबिलिटी’ जास्त असतात. याउलट श्रीमंत माणसे एसेट मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, व या एसेट मधून आलेल्या उत्पन्नाच्या बळावर चैनीच्या वस्तू घेतात.

सबब, उत्पन्नापेक्षा खर्च कमी ठेवत बचत व गुंतवणुक करावी. मग त्या गुंतवणुकीतून आलेल्या उत्पन्नातून चैनीच्या वस्तू घ्याव्यात. अन त्या गुंतवणूकीच्या उत्पन्नातूनच घरखर्च चालवणे आपण साध्य करू शकलो तर चरितार्थासाठी आपल्याला नोकरीच काय, कोणतेही काम करण्याची गरज नाही असा दावा लेखक करतात. पुस्तक तसे चांगले आहे. पण आपण असे बसून खाऊ शकतो हा दावा पटणे कठीण आहे.

गुंतवणुकीचे विविध पर्याय असतात. शेअर,  म्युचुअल फंड, बॉंडस, फिक्स्ड डिपोझीट, रिअल इस्टेट वगैरे वगैरे. आता लेखक सांगतात की आपण केवळ रिअल इस्टेटचे छोटे मोठे व्यवहार करून पैसा करतो. रिअल इस्टेट मार्केटमध्ये मंदी असताना घरे विकत घेतो व मार्केट चढले कि ती विकतो. त्याचबरोबर कर बचत करण्यासाठी आपण असे व्यवहार करणारी एक कंपनी रजिस्टर केल्याचेही ते सांगतात. याचा अर्थ ते केवळ नोकरी सोडून रिअल इस्टेटच्या धंद्यात शिरलेत. बरे, गुंतवणुकीचे मोठमोठे व्यवहार करताना आपल्याला रिस्क घ्यावी लागते, सतत वाचन, चिंतन, अभ्यास करावा लागतो हेही ते सांगतात. म्हणजे ‘नोकरी पासून मुक्ती’ हे अर्धसत्य आहे.

पण या स्थितीत येण्यास आपल्याला २५ वर्षे लागली हेही लेखक सांगतात. रिस्क घेण्यास कचरू नये, कोणतीही वस्तू आपल्याला परवडत नाही म्हणून गप्प बसण्यापेक्षा ती घेण्यासाठी पैसा कसा आणता येईल असा विचार करावा असे साधे सोपे मंत्र ते देतात  कर्ज असले तर पगार आल्याबरोबर प्रथम कर्जाचे हफ्ते फेडून कंगाल होऊन बसू नये त्याऐवजी  सर्वप्रथम बचत करावी. यामुळे थोडीशी आर्थिक ओढाताण होईल, पण त्या तणावाचा वापर पैसे कमावण्याच्या नवीन युक्त्या शोधण्यासाठी करावा. या व अशा अनेक क्लुप्त्या या पुस्तकात आहेत.

परंतु हे पुस्तक १९९७ साली प्रकाशीत झालेले असून त्यातील कर वाचवणे, गुंतवणुकीचे पर्याय निवडणे हे सर्व त्या काळातील अमेरिकी अर्थव्यवस्थेबद्दल लिहिलेले आहे. २०१९ मधील भारतीय अर्थव्यवस्थेस ते सर्व जसेच्या तसे लागू होत नाही. उदाहरणार्थ लेखक सांगतात कि नवीन घर घेऊन ते भाड्याने देण्यापेक्षा मी दिवाळखोर लोकांनी विकण्यास काढलेली घरे स्वस्तात विकत घेतो व ती चढ्या दराने विकून टाकतो. आता अमेरिकेत दिवाळखोरीचे प्रमाण फार मोठे आहे. पण भारतीय इतके उधळपट्टी करणारे नाहीत. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे झटपट यशाचा महामार्ग नसून योग्य आर्थिक नियोजनासाठी केवळ एक मार्गदर्शक आहे. स्वतः लेखकांनी देखील हि बाब अधोरेखित केली आहे. तसेच गुंतवणुकीचे पर्याय अनेक असतात. त्यातील प्रत्येकाला प्रत्येक प्रकार जमतोच असे नाही. काही जणांना रिअल इस्टेट मध्ये रस असतो तर काही शेअर मार्केटच्या चालींमध्ये वाकबगार असतात. इतर काही लोकांना रिस्क घेणे आवडत नाही ते म्युच्युअल फंड्स किंवा फिक्स्ड डीपोझिट मध्ये पैसा गुंतवतात. तात्पर्य ज्याने त्याने आपल्या आवड व ऐपतीप्रमाणे गुंतवणुकीचे पर्याय निवडावे हेही लेखक स्पष्ट करतात.

अशा प्रकारे ‘हे पुस्तक डोळसपणे वाचा, व स्वतःचा मार्ग स्वतः निवडा’ हे लेखकानेच सांगितल्याने वीस वर्षे जुने पुस्तक असून देखील ते आजही वाचण्यासारखे आहे.


Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी