युद्धविराम


सह्याद्रीच्या रांगांमधील डोंगरमाथ्यावर वसलेल्या त्रीनेत्रगडाच्या तटावर मशाली शांतपणे तेवत होत्या. वारा पडला होता. चांगला अल्ल्हाददायक हिवाळा असूनही गडावरील वातावरण तंग होते. शेषगिरी साम्राज्याचे महाराज नागेंद्रदेव आपल्या मोजक्या मंत्र्यांसाहित विचारविनिमय करण्यात मग्न होते. इतक्यात अचानक आरोळ्या घुमू लागल्या “पकडा, मारा, सोडू नका...” महाराज चमकून खलबतखान्याच्या खिडकीपाशी जाणार तोच खिडकीतून एक बाण येऊन समोर टांगलेल्या त्यांच्या तसबिरीत घुसला. “महाराज, कक्षातून बाहेर पडू नका.” त्यांच्या विश्वासू अंगरक्षक तुकडीचा प्रमुख आपल्या काही माणसांसहित खलबतखान्यात शिरला आणि त्याने रक्षकांना महाराजांभोवती कडे करण्याचा आदेश दिला. “राघव, अरे काय चालले आहे?” त्यांनी अधिकाऱ्यास विचारले.

“आपल्याशी धोका झाला आहे महाराज...ते पांढरे मारेकरी...त्यांचा प्रमुख दुसरा तिसरा कोणी नसून....” पुढे तो  काही बोलणार इतक्यात एक बाण येऊन सपकन त्याच्या डोक्यात शिरला आणि तो तिथेच कोसळला. महाराजांनी समोर पहिले तर एक पांढरा फेटा बांधलेली आकृती खिडकीतून यायचा प्रयत्न करताना त्यांना दिसली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या फेटेवल्या मारेकर्यांची मागील काही दिवसात राज्यात फारच दहशत पसरली होती. आणि आता तर त्या लोकांनी थेट राजवाड्यावर हल्ला केला होता. पण आपण इथे खलबतखान्यात आहोत हे या लोकांना कळले कसे?

तिथे क्षणार्धात अंगरक्षकांनी त्या मारेकऱ्याला यमसदनी धाडले. तोपर्यंत दुसऱ्या बाजूस  एक मोठ्ठा स्फोट होऊन दालनाचा दरवाजा धडकन पडला आणि कक्षात शिरले युवराज चक्रध्वज.  “युवराज तुम्ही तर…” महामंत्री विरुपाक्ष काही बोलणार इतक्यात युवराजांनी त्यांच्याच पोटात तलवार खुपसली. आश्चर्य, भीती, आणि अविश्वासाने मंत्र्यांचे डोळेच विस्फारले. युवराजांपाठोपाठ पंधरावीस पांढरे फेटेवाले आत शिरले  “कापून काढा सर्वाना.” युवराज कडाडले “या कक्षातून कोणीही जिवंत बाहेर पडता कामा नये.”   

हे शब्द ऐकून महाराज नागेंद्रदेव आवक झाले. त्यांचे रक्षक मारेकार्यांशी झुंजू लागले, पण तुलनेने अधिक कुशल व चपळ असलेल्या मारेकार्यांपुढे त्यांचा निभाव लागेना. महाराजांच्या नजरेसमोर त्यांचे अमात्य, महामंत्री, कोषाध्यक्ष, असे एकेक करत सारे मंत्रिमंडळ त्यांचेच युवराज संपवत होते. “माझाच मुलगा...आपलेच राज्य…” धक्क्याने गलितगात्र झालेल्या महाराजांच्या तोंडून शब्द फुटेना.या सार्या रणधुमाळीत अजून एक खणखणीत आवाज घुमला   “युवराज, गड आता आपल्या ताब्यात आला आहे”. महाराजांनी आवाजाच्या रोखाने पहिले. हे तर सरसेनापती पद्मनाभ ज्यांची हत्या झाल्याची बातमी होती!

धक्यावर धक्के बसल्याने महाराजांचे शरीर व मन जर्जर झाले.  “कैद करा त्यांना.” कठोर कोरडेपणाने युवराजांनी आदेश दिला, आणि अपादमस्तक पांढराशुभ्र वेश धारण केलेल्या दोन माणसांनी येऊन महाराजांना बेड्या ठोकल्या.
“पुढील आदेश युवराज…” सरसेनापती म्हणाले.
“राज्याच्या उत्तरेस सीमेपार गेलेले सैन्य ताबडतोब माघारी बोलवा. गरज पडल्यास शत्रूशी तहाची बोलणी करा…”

“तह?” बंदिवान स्थितीतही ‘तह’ हा शब्द महाराज नागेन्द्राना खटकला. “त्या व्रजदेसी व्यापारी भामट्यांशी तह?”
“होय.” युवराज महाराजांकडे वळले “काळ बदलतो आहे. त्याबरोबर आपल्यालाही बदलले पाहिजे. मग तुम्ही ते करणार नसाल तर आम्ही आमच्या पद्धतीने करू” पुढे महाराज काही बोलणार इतक्यात युवराजांनी इषार केला अन त्यांच्या माणसाने महाराजांच्या डोक्यावर एक जोरदार प्रहर केला. राजे नागेंद्रदेव लागलीच बेश्द्ध पडले.

आता युवराजांची मुद्रा गंभीर झाली “पद्मनाभजी, आपला कार्यभाग साधला पाहिजे अन्यथा केवळ अपयश आणि बदनामी पदरी यायची.”

“तलवारीच्या सावलीतच शांतता सुखाने नांदते असे म्हणतात युवराज. शुभकार्य निश्चितच साधेल.”

सरसेनापतीच्या सांगण्याने काहीसे आश्वस्त झालेल्या युवराजांनी लगोलग आपल्या विश्वासू माणसांना दरबारात हजर होण्याचा आदेश जारी केला, आणि ते पुढील योजना आखण्यासाठी परिस्थितीचा आढावा घेऊ लागले.

भारतवर्षातील सर्वच्या सर्व महत्वाची बंदरे आपल्या अंमलाखाली आणण्याच्या महत्त्वाकांक्षेने राजे नागेन्द्रदेव पेटून उठले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शेषगिरी साम्राज्य विस्ताराची महत्वाकांक्षा बाळगून गेली सात वर्षे सतत युध्द करत होते, व आता दक्षिणेकडील कोची पासून उत्तरेत वापी पर्यंत कोकण व मलबार किनारपट्टीवर सरळ पसरलेले होते. वर्षाभापुर्वी दक्षिणेत कोची तेथील केरळ राज्याकडून जिंकल्यानंतर नागेन्द्रदेवानी  उत्तरेस असलेल्या व्रजदेश राज्यातील बिलीमोरा बंदरावर चाल केली होती, पण वापी येथे झालेल्या पराभवापासून धडा घेतलेल्या शत्रूने मोठ्या कौशल्याने वेढा घालून शेषगिरी सैन्यास अडकवून ठेवले होते. ही कोंडी सोडवण्यासाठी शेवटी  महाराजांनी आपला पराक्रमी पुत्र युवराज चक्रध्वज याला  आघाडीवर पाठवले होते. वास्तविक युवराजांचा या युद्धास विरोध होता. आधीच भारतवर्षातील सर्वात बलशाली साम्राज्यांपैकी एक असलेल्या शेषगिरी साम्राज्याचा अजून विस्तार करू नये. त्याऐवजी व्यापारास अधिक उत्तेजन देऊन  व शेतीवर वाज्ञानिक प्रयोग करून मुलुख भरभराटीस आणावा, विद्यापीठे उभारून  प्रजेस शिक्षित करावे असे त्यांचे मत होते. पण ते दरबारातील कोणालाही मान्य नव्हते.विद्यापीठे उभारून राज्याच्या तिजोरीत तर काही भर पडत नाही, आणि राज्य विस्तारले की सहज कराची आवक वाढेल असे असताना उगाच हे शेतीचे प्रयोग करत बसून मग शेतकऱ्यांचे आणि व्यापार्यांचे  उत्पन्न वाढण्याची वाट पाहत राहायचे हा कसला खुळेपणा?

“युवराज, ऐन तारुण्यात तलवार गाजवायची सोडून हि कसली स्वप्ने पाहताय तुम्ही?”  महाराज भर दरबारात गरजले होते. तर  “आयती मिळणारी लढण्याची संधी सोडून तुम्हाला हे शेती करण्याची आणि पैसा पैसा खेळण्याची आवड आहे, म्हणजे तुम्ही क्षत्रिय नसून दासीपुत्र आहात कि काय? असा टोमणा  महामंत्री विरुपाक्षनी खाजगीत मारला होता. युवराजांच्या विचारांचे संपूर्ण मंत्रिमंडळात हसे झाले होते.

फक्त सरसेनापती पद्मनाभ, ज्यांनी आपल्या दोनपैकी एक पुत्र वापीच्या युद्धात गमावला होता, त्यांना युवराजांचे म्हणणे पटत होते. पण भर दरबारात काही ते युवराजांना समर्थन देऊ शकत नव्हते. त्यामुळे शेवटी युद्धाला तोंड फुटले, आणि सहा महिने शेषगिरी सैन्य वेढ्यात अडकून पडल्यावर स्वतः युवराजांना आघाडीवर धाडण्याची पाळी महाराजांवर आली.

मात्र युवराज तेथे रवाना झाल्यानंतर दोन तीन महिन्यातच काही चमत्कारिक घटनांनी  राजधानी विजया नगरी   हादरून गेली होती.

सर्वप्रथम  आघाडीवर तैनात असलेले सरसेनापती पद्मनाभ यांची हत्त्या झाल्याची बातमी आली होती. खरे म्हणजे युद्धभूमीवरील सेनापतींच्या निवासात सापडलेले डोके व चेहेरा ओळखण्यापलीकडे ठेचलेल्या स्थितीतील प्रेत नेमके कुणाचे याबद्दल संशय व्यक्त होत होता. या घटनेनंतर   त्यानंतर आठ-दहा दिवसातच सैन्याला शस्त्रपुरवठा करणारे दोन मोठे व्यापारी भारमल व जयचंद, अचानक बेपत्ता झाले होते. पण महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही घटनास्थळावर एक संदेश लिहिलेल्या चिठ्ठ्या आढळल्या होत्या:

“लाभले सर्व ऐश्वर्य अन स्थैर्य
तथापि आरंभिले समर क्रौर्य
शेषगिरी राज्ये

ऐसे लोभ-मोह सोडोनी द्यावे
आपुले राज्य सुखेनैव  सावरावे
अन्यथा सर्वनाश”

या घटनांमागे शत्रुपक्षाचा हात असावा अशी शंका घ्यावी, तर तिथे व्रजदेशाचे सेनापती रुद्रेश्वर हे देखील अचानक बेपत्ता झाले होते, आणि त्या ठिकाणी देखील अशीच चिठ्ठी आढळून आली होती.
मात्र महामंत्री विरुपाक्ष यांना मारण्याचा या मारेकर्यांचा प्रयत्न फसला होता, अन एक आपादमस्तक पांढरा वेश परिधान केलेला मारेकरी सैनिकांच्या हाती लागला होता. शेषगिरी सैन्याच्या हाती पडताच त्याने लगेच आपले जीवन संपवले होते, पण त्याच्या जवळील शस्त्रे व इतर काही वस्तूंमुळे  व्रजदेशाच्या पुढे वायव्य दिशेस  मरुभूमी नामक प्रांतातून तो आला असावा असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसार या प्रदेशाकडे तडक स्वार रवाना करण्यात आले होते आणि  मारुभूमितील वाळवंटात असलेल्या एका किल्यात संपूर्ण पंधरा वेश परिधान करणाऱ्या या ‘शान्तिदुतांचे’ वास्तव्य असल्याचा सुगावा शेषगिरीच्या गुप्तहेरांना लागला होता.

 आता  या किल्यावर धडक मारण्याची योजना आखण्यासाठी महाराज नागेन्द्रदेवांनी आजची बैठक बोलावली होती.

या नागेद्रदेवांच्या युद्धपिपासू वृत्तीतूनच ‘शांतीदूतांचा उगम झाला होता. राजे सामोपचाराने ऐकत नाहीत हे पाहून युवराज चक्रध्वज आणि सरसेनापती पद्मनाभ यांनी पाच वर्षांपूर्वी सैन्य व सरकारी अधिकारी वर्गातील  युद्धाला विरोध असलेल्या घटकांना एकत्र आणण्यास सुरुवात केली होती.शांती, स्थैर्य, अन विकास हि त्रिसूत्री केंद्रस्थानी ठेऊन ‘शांतीदूत’ गुप्तपणे वावरू लागले.

युद्धात सर्वस्व गमावलेल्यांना आधार देणे, समेट होईल असे वातावरण निर्माण करणे याबरोबरच शक्यतो हिंसेचा वापर टाळत शांतीस्थापनेस अडसर ठरू पाहणाऱ्या घटकांना हटवणे  असे कार्य ही संघटना करू लागली. मात्र गरज पडेल तेथे बलाचा वापर करण्याची त्यांची तयारी होती. शेतीवरील वैज्ञानिक प्रयोग व त्याचबरोबर युद्धकला व नवी शास्त्रे यावर संशोधन करण्यासाठी युवराज व सर्सेनापातींनी व्रजदेशाच्या उत्तरेस असलेली मरुभूमितील वाळवंटात ‘कुंभाळगड’ उभारला होता, अन त्याचा सुगावा काही दिवसांपूर्वीच शेषगिरीच्या हेरांना लागला होता.

हा किल्ला हुडकून काढण्यात सुदैवी ठरलेल्या शेषगिरीच्या हेरांचे दुर्दैव असे कि हि बातमी त्यांनी सर्वप्रथम युवराज चक्रध्वज यांनाच दिली, अन वापी येथे तैनात असलेले युवराज ताबडतोब राजधानी विजया नगरीच्या दिशेने दौडू लागले. त्यांनी पुढे पाठवलेल्या गुप्त स्वारांनी त्रिनेत्रगडावरील  आपल्या माणसांना आधीच सावध केले होते, व युवराज आल्यावर अचानक शेषगिरीच्या सैन्यात असलेल्या ‘शांतीदूतांनी’ गोंधळ माजवून गड आपल्या ताब्यात घेतला होता.

अचानक घडलेल्या या धक्कादायक घटनांनी युवराज काहीसे खिन्न झाले होते. आता रिकाम्या सिंहासनाच्या दिशेने जाताना त्यांच्या डोक्यात विचारांचे काहूर उठले होते, पण त्यात नव्या योजना आणि येणाऱ्या शांतीच्या आशेचे किरणही होते. आसनावर बसून युवराजांनी एकदा आपल्या तरुण शांतीदूत सवंगडयांकडे पाहिले. सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे कारंजे फुलले होते. युवराज काही बोलणार इतक्यात पुन्हा सरसेनापती पद्मानाभांचा दमदार आवाज दरबारात घुमला, आणि घोषणांनी दरबार दुमदुमला

“महाराज चाक्रध्वजदेव यांचा विजय असो !”

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी