जगण्याचा वेग कमी करणे गरजेचे :कार्ल होनोरे

धकाधकीचे रुटीन नाकारून शांत जीवनाचा आग्रह धरणाऱ्या ‘स्लो मुव्हमेंट विषयी याआधी या सदरात चर्चा झाली आहे. ”कार्ल होनोरे” लिखित “इन प्रेझ ऑफ स्लोनेस” या पुस्तकाचा संदर्भ त्या लेखात दिला होता. या चळवळीचे आजचे स्वरूप व भारत याविषयी इ-मेल द्वारे कार्ल होनोरे यांची एक छोटीशी मुलाखत मी ‘द गोवन’ तर्फे काही दिवसापूर्वी घेतली. ध्यानधारणा, योग, आयुर्वेद हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ खरे तर संतुलित जीवनाची गुरुकिल्ली आहेत आणि ते आपण सोडता कामा नये मत श्री होनोरे यांनी मुलाखतीदरम्यान मांडले.

  • आपण ‘स्लो डाऊन’ होणे गरजेचे आहे असे तुम्हाला कधी व का वाटले? 

मी आपल्या मुलाला रात्री गोष्टी वाचून दाखवत असे. मला वेळ कमी असल्याने काही ओळी, काही परिच्छेद किंवा काही पाने गाळून मी लवकरात लवकर गोष्टी संपवण्याचा प्रयत्न करायचो. साहजिकच  याचा माझ्या मुलाला खूप राग येई, त्यामुळे मग मलाही त्याचा राग येई. अशातच एक दिवस मला “वन-मिनिट बेडटाईम स्टोरी” अर्थात कोणतीही परीकथा एका मिनिटात मुलांना ऐकवण्याची सोय करणाऱ्या कलेक्शनची जाहिरात दिसली आणि वाटले व्वा! हे बरेच झाले. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात विचार आला कि आपल्या मुलाला देखील अशा प्रकारे कटवण्याची पाळी यावी इतकी आपल्याला घाई आहे का? आपण जीवन जगणे विसरून केवळ पळतो आहोत, आणि हे बदलायची गरज आहे हे तेव्हाच माझ्या लक्षात आले.

  • स्लो मुव्हमेंटची व्याख्या तुम्ही कशी कराल? 

“फास्ट म्हणजे चांगले” या धारणेविरुध्द असलेली ती एक सांस्कृतिक क्रांती आहे.”स्लो” म्हणजे सर्वकाही गोगलगाईच्या गतीने करावे असे नव्हे.  सर्व गोष्टी योग्य त्या गतीने कराव्या, शक्य तितक्या चांगल्या पध्दतीने कराव्या  हा स्लो तत्वज्ञानाचा गाभा आहे. आपले काम, जेवण, इथपासून पालाकात्वापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये quantity ऐवजी quality ला प्राधान्य द्यावे. यातही “चांगले स्लो” आणि “वाईट स्लो” हे आहेच. कुठेतरी एकीकडे आपण गरजेपेक्षा अधिक स्लो झालो तर दुसरीकडे कुठेतरी आपल्याला अधिक फास्ट व्हावे लागेल. इथे समतोल महत्वाचा आहे.

  • स्लो मुव्हमेंटचा आजच्या कार्यसंस्कृतीवर कितपत प्रभाव पडला आहे?

स्लो मुव्हमेंट कोर्पोरेट जगतात झपाट्याने पसरत आहे.जगभरातील कंपन्या आपल्या कर्मचार्यांना काहीसा निवांतपणा देण्याचे विविध मार्ग शोधात आहेत. त्यांना आपल्या वेळेवर अधिक नियंत्रण देत आहेत, आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या गतीने काम करण्याची संधी देत आहेत. कामाचे तास कमी करणे किंवा कामात ब्रेक घेऊन योग व ध्यानधारणा करण्यासाठी खास रूमची सोय करणे असे विविध उपक्रम कंपन्या राबवत आहेत.

  • भारतात हि चळवळ कितपत मूळ धरते आहे?

माफ करा, पण भारतातील घडामोडींवर माझे इतके लक्ष नसते पण तिथे “स्लो फूड” चळवळ चांगली चालली आहे इतके मी सांगू शकतो. मला स्वतःला भारतीय संस्कृतीविषयी खूप आदर आहे. तुमचे मेडीटेशन, आयुर्वेद हे “फास्ट” जीवनशैली काबूत आणण्याचे उत्तम उपाय आहेत. इतर विकसनशील देशांप्रमाणे जलद विकासापायी  “फास्ट” होण्यासाठी भारतावर खूप बाजूनी दबाव येतो आहे, पण माझे ऐकाल तर त्याला बळी पडून आपली सुंदर संस्कृती तुम्ही सोडू नका.

  • भारतातले कदाचित सर्वात निवांत राज्य असलेल्या गोव्याबद्दल आपले काय विचार आहेत?

गोव्याबद्दल मला केवळ दोनच गोष्टी माहित आहेत, एक म्हणजे इथले जेवण रुचकर आहे, दुसरे, इथे पर्यटक भरपूर येतात -काहीवेळा अति प्रमाणात येतात. हा स्लो मुव्हमेंटमधील एक गंभीर दोष आहे. काहीवेळा एखादी जागा आपल्या निवांतपानाचीच शिकार बनते. “फास्ट” लोक काही क्षण “स्लो डाउन” होण्यासाठी येथे येतात आणि त्या जागेलाच फास्ट बनवून टाकतात. हे टाळले पाहिजे.


Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी