चांगल्या संधी कुठे आहेत?: एक उदाहरण

काही दिवसांपूर्वी गोव्यातील युवक युवतींची सरकारी नोकरीसाठीची धडपड पाहण्यास मिळावी. केवळ ५४ च्या आसपास असलेल्या पदांसाठी हजारो अर्ज आले, नोकऱ्या नाहीत अशी ओरड झाली. तसे पहिले तर नोकरीच्या अनेक संधी आहेत, पण आपल्याला त्यासाठी लागणारे किमान कौशल्य आहे कि नाही हे आजच्या युवकांनी तपासून पाहण्याची गरज आहे. यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी वृत्तपत्र जगतातील परिस्थितीचे एक उदाहरण देतो. 

वृत्तपत्रातील काही सहकारी सांगतात कि कोणत्याही विषयांवर लेख लिहून पाठवा असे आवाहन केले कि काम सोपे होण्याऐवजी त्यांना उलट ताप सहन करावा लागतो.  दुर्दैवाने हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक  चांगले लेख लिहून पाठवतात. काही लेखांची भाषा इतकी वाईट असते कि ती सुधारण्यात बराच वेळ वाया जातो. त्यातून मग जे लोक चांगले काम करू शकतात त्यांच्यावर ताण पडतो. एकीकडे दर्जेदार लेखक सगळीकडे प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतात. मग आपण लेख पाठवूनही तुम्ही छापत नाही अशी तक्रार करत लोक आम्हालाच धारेवर धरतात. म्हणजे विकिपीडिया किंवा तत्सम वेबसाईटवरून उचलून लेख पाठवणार तुम्ही, उगाचच "आमच्या ८० वर्षाच्या आजीचा दिनक्रम" वगैरे असले काहीबाही लिहून पाठवणार तुम्ही, आणि ते छापले नाही तर दोष आमचा हा कुठला न्याय?

असे झाले कि मग जे चांगले लिहितात त्यांच्याकडून अधिकाधिक लिहून घ्यावे लागते आणि ताण अति झाला कि तेही आमच्यावर वैतागतात. प्रसिद्ध सर्वाना व्हायचे असते, पण त्यापायी चांगली पुस्तके वाचणे, लिहिण्यासाठी विचारपूर्वक विषय निवडणे, त्यावर थोडे संशोधन करणे हि कामे कितीसे लोक करतात हा प्रश्न आहे.

खाजगी क्षेत्रात पुढे यायला मेहेनत करायची तयारी लागते ती सरकारी नोकरीत लागत नाही हा बऱ्याच लोकांचा एक गोड गैरसमज आहे. त्याचबरोबर आपल्याला असे बसून खायला हवे म्हणून वाट्टेल ते करून सरकारी नोकरी मिळवायची आणि मग सरकारच कसे अकार्यक्षम आहे अशी टीका करत राहायचे. काही करून दाखवण्याची जिद्द सोडून केवळ 'सेटल' होण्याची गेरेन्टी म्हणून लोक सरकारी नोकरीत आले तर सरकार कार्यक्षम कसे होईल? इथेही नवनव्या योजना आखण्याचे आणि त्या राबवण्याचे कौशल्य पाहिजे. आपल्याला हे कौशल्य आहे का? समाजकार्याची आवड आहे का? यावर कोण विचार करते? असो.

उद्योग जगतात कुशल माणसांची कमतरता असल्याने ज्यांच्याकडे कैशल्य आहे त्यांच्यावर अति ताण पडतो हि नाण्याची दुसरी बाजू. असे कितीतरी महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी व नोकरदार आहेत ज्यांच्याकडे "आमच्यासाठी लेख लिहा" म्हणत वृत्तपत्रे रंग लावून उभी आहेत आणि प्रत्येकाची मागणी पूर्ण करता करता हे लेखक कामाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. पण त्यांचे दुःख समजून घ्यायला कोणालाही वेळ नाही. तसेच सगळीकडे हेच लोक कसे प्रसिद्ध होतात असा प्रश्न विचारात दात ओठ खाणाऱ्या लोकांचीही संख्या कमी नसते. हा इतरांनी ते कौशल्य विकसित न केल्याचा परिणाम आहे. आजच्या जगात टिकण्यासाठी मेहेनत , सखोल अभ्यास, व कल्पकतेला पर्याय नाही.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी