दुष्मंत चक्रा


आपण तारुण्यात केलेल्या काही चुका पुढे आयुष्याभर आपल्याला छळत राहतात. अशाच एका मोठ्या चुकीची किंमत आज हे पुस्तक लिहिताना मी चुकवतो आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात चांगले वर्षभर काढूनही या शहराविषयी मी फार काही लिहू शकत नाही. कारण माझा बहुतांश वेळ मेक्स म्युलर भवन मध्ये जर्मन भाषा आणि संस्कृतीत गटांगळ्या खाण्यात जायचा.

बाकरवडी, ठेचा, मिसळ अशा झणझणीत मराठी पदार्थांनी भरलेल्या ताटात हळूच लपून बसलेल्या विदेशी चॉकलेटसारखं छोटसं टुमदार ‘एम एम बी’ अस्सल देशी वळणाच्या पुण्यात जर्मन भाषा घोळवू पाहतं आहे. शिकणे आणि शिक्षण याविषयी शाळा नामक भयानक संस्थेने माझ्या मनात जे काही गैरसमज निर्माण करून ठेवले होते ते सर्व  ‘एम एम बी’ ने दूर केले. भाषा शिकणे म्हणजे केवळ निरस व्याकरण व  जाडजूड शब्दकोष नसून तो देश ती संस्कृती यामध्ये बुडून जाणे होय, हे येथील पहिले सूत्र. म्हणूनच कि काय,  ‘एम एम बी’त शिरलं की सर्वप्रथ लॉबीच्या एका कोपऱ्यात सतत  जर्मन DW चानेल दाखवणाऱ्या  टीव्हीचा आवाज कानावर पडायचा. संस्थेच्या मागे असलेल्या छोट्याशा परसात जर्मनांचा लोकप्रिय खेळ ‘टिशफुसबाल’ खुणावत राहायचा आणि त्याच्याभोवती जमलेलं पुण्यापासून असाम, राजस्थान युपी अशा देशभरातून आलेल्या लोकांचं कोंडाळ “झेर गुट” (sehr gut- खूप छान ) किंवा “हेर गॉट” (herr Gott- अरे देवा) म्हणत जर्मनमध्ये हार-जीत व्यक्त करायचं

पुस्तकापेक्षा बोलणे, गाणी, आणि दर बुधवारी दाखवला जाणाऱ्या जर्मन सिनेमावर चर्चा अशा गोष्टींवर शिक्षक भर द्यायचे त्यामुळे वास्तविक अत्यंत अगोड, जिभेला पीळ पडणारी हि भाषा शिकणे हा पण खूप आनंददायी अनुभव होता. पण हा आनंद शतगुणित करत शिकणे व शिक्षण याविषयीच्य माझ्या कल्पना पार उलट्या पालट्या करणारा माणूस म्हणजे संस्थेतील सर्वात वरिष्ठ शिक्षकांपैकी एक असलेले श्री दुष्मंत चक्रा. संपूर्ण टक्कल पडलेले मोठ्ठे डोके, आणि चकाकणारे मिश्कील डोळे असलेले चक्रा सर क्लासमध्ये केवळ उत्साह निर्माण करायला यायचे आणि आम्ही मस्त रंगात आलो कि हळूच काहीतरी शिकवायचे.   

“अरे बाजूला ठेवा ती पुस्तकं. मस्त गप्पा मारा. भाषा बोलून शिकावी व्याकरण रटून नव्हे.” अशी क्लासची सुरुवात करणाऱ्या या माणसाचे फंडेच काहीसे विचित्र होते. एखाद्या घोषणेसारखं हे फंडे अजून माझ्या कानात वाजत आहेत

“आईन फेलर इस्ट काईन फेलर” (ein Fehler ist kein Fehler) पहिली चूक माफ असते.. “पहिल्या तीन चुका सोडून द्या. त्यानंतर जर तुम्ही चूक करत असाल तर मग तुम्हाला माझी गरज आहे.” असं म्हणत ते आम्हालाच एकमेकांचा होमवर्क तपासायला आणि चुका दुरुस्त करायला लावायचे.  वर्गात बोलायला किंवा लिहायला एखादा विषय द्यायचे आणि आम्हालाच एकमेकांचे निबंध तपासायला लावून स्वतः केवळ उत्तेजनपर काहीतरी बोलत राहायचे.

शोन झायलन मार्कीयरन (schoene Zeilen markieren) अर्थात “सुंदर ओळी अधोरेखित करा”. “आरमात धडे वाचा आणि तुम्हाला आवडलेल्या सुंदर ओळी, जर्मन भाषेतील वाक्प्रचार आणि म्हणी अधोरेखित करा. बेसिक व्याकरण शिकून झालं कि भाषेचा लहेजा आणि सौंदर्य याकडे लक्ष द्यावे. बोलणे ऐकून, बोलून शिकावे.”  

फील द श्पास Feel the Spass (Spass याचा अर्थ जर्मन भाषेत “मजा” आणि viel Spass म्हणजे “भरपूर मजा , पण इंग्लिश मध्ये Feel म्हटलं कि मजा अनुभवा असा अर्थ होतो) “सोडा राव ते सिलेबस वगैरे. मजा करा. जमेल तितके बोला, गाणी ऐका, सिनेमा बघा.” असं म्हणत भाषा शिकताना मजा येणे सर्वात महत्वाचे असते हे पटवून देणारा शिक्षक मी आयुष्यात पहिल्यांदा पहिला. आजही कधी कधी त्या  प्रेमळ, मिश्कील चक्रा साहेबांच्या आठवणीने मी अस्वस्थ होतो. अशी गेली दोन दशके हजारो विद्यार्थ्यांच्या भावविश्वात निखळ आनंद निर्माण करणाऱ्या त्या अवलियाला माझी मात्र आठवण नाही.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी