तीन अवलियांची कथा

पुण्यातील मेक्स म्युलर भवन मध्ये जर्मन भाषा शिकत असताना मला असे काही अवलिये भेटले कि स्वतःच्या सुशेगाद, मिळमिळीत जगण्याची एकीकडे शरम वाटू लागली त्याचप्रमाणे “हे जग फार निष्ठुर असते, पावला पावलाला तडजोड करावी लागते" वगैरे असले सिद्धांत कुठून जन्माला येतात तेही लक्षात आले. या साऱ्या गोष्टींचा साक्षात्कार मला होण्याचे कारण म्हणजे तीन पुणेरी तरुण. इथे आपण त्यांची नावे ठेऊ “चित्रकार,” “मेकानिक” आणि “इंजिनियर”. तिघेही उच्च मध्यमवर्गीय लोक. पण ध्येयासक्ती नावाचा प्रकार काय असतो, आणि ती नसली कि काय होते हे या त्रयीच्या आयुष्याकडे पाहून समजावे.

तिघांचे वय वर्षे तेवीस. पण चित्रकार हा यातील सर्वात उत्साही आणि अनुभवसमृद्ध प्राणी. एक साधी स्कूटर घेऊन क्लासला यायचा. शाधासा बिनबाह्यांचा शर्ट, पाठीला एक सेक ज्याच्यात एक स्केचबुक, एक पेन आणि एक पेन्सिल. कधी कधी तर खिशात पाकीट देखील नसे. पण हा त्याचा अवतार फसवा होता. क्लासमध्ये एकटाच कोपऱ्यात चित्र काढत बसणार्यापैकी हा मनुष्य नव्हता. मिश्कील आणि खट्याळ स्वभावाचा हा माणूस पटकन काहीतरी विनोदी बोलून क्लासमध्ये धमाल उडवून देत असे. त्याला प्रवासाची जाम आवड होती, आणि वडील प्रथितयश वकील असल्याने जेमतेम विशीला टेकेपर्यंत हा मुलगा १४ देश फिरला होता! भोवती मित्रांचे कोंडाळे जमवून तो त्यांना देश-विदेशातील नाना अनुभव सांगत आणि आपली वेगवेगळी चित्रे दाखवीत बसे. आणि हो, नोकरीचे म्हणाल तर फाईन आर्ट आणि डिझाईन शिकलेला हा तरुण पुण्यातील मार्साडीस बेंझ प्लांटमध्ये गाड्यांचे इंटीरिअर डिझाईन डेव्हलप करणर्या टीमचा सदस्य होता. कला हेच त्याचे जीवन होते. आपल्या आवडीच्या क्षेत्रातील नोकरी असल्याने तो फार आनंदी होता, आणि नोकरीच्या ठिकाणी गरज पडे म्हणून जर्मन भाषा शिकत होता. पुढे हा क्लास सोडून डिझाईन या विषयातील उच्च शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेला गेला.

त्याउलट “इंजिनियर” हा ऐहिक सुखे आणि यशच्या शिखरावर असूनही कायम प्रचंड गोंधळलेला असे. त्यला खरे म्हणजे झाडे आणि प्राणी यांची आवड होती. अनेक औषधी झाडे आणि घरगुती उपाय त्याला माहिती होते. गंमत म्हणजे त्या उपायाचा परिणाम तपासण्यासाठी हा मुद्दाम पावसात भिजायचा आणि मग सर्दी आली की एकेक उपाय स्वतःवरच करून बघायचा.  बाकी तासंतास नेशनल जिओग्राफीक चेनल पाहत असायचा. दुर्दैवाने हा मुलगा पेशाने मेकानिकल इंजिनियर होता. त्याल  कामही बऱ्यापैकी जमत असे पण ते आवडत मात्र अजिबात नव्हते. बर त्याला निरनिराळी झाडे, प्राणी, पक्षी निरीक्षणाचा जरी चंद असला तरी तो पुढे विकसित करण्यासाठी देखील त्याने काहीही केले नव्हते. ना तो या विषयाशी संबंधित कुठली पुस्तके वाची, ना कुठले बर्ड वोचींग टूर वगैरे असल्या उपक्रमात भाग घेई. केवळ निसर्गाशी संबंधित टीव्ही प्रोग्राम बघण्यापलीकडे त्याची मजल कधीही गेली नाही.  “तू आपल्या जीवनाबद्दल समाधानी आहेस का?” या प्रश्नाला “मी खुशही नाही आणि दुख्खी देखील नाही” असे मोघम उत्तर देई. तो जर्मन भाषा का शिकतोय तेही त्याला माहित नव्हते. “वाटले सहज काहीतरी वेगळे करून पाहू.” असे अस्पष्ट पुटपुटे. पुढे तो इंजिनियरिंगमधील उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला, पण तिथेही मानसिक गोंधळाने त्याची पाठ सोडली नाही. आयुष्य फार कठीण असते, पावलोपावली तडजोड करावी लागते वगैरे असे तत्वज्ञान हे अशा निवड चुकलेल्या लोकांकडून येते. वास्तविक आपली आवड ओळखून त्याप्रमाणे कार्यक्षेत्र निवडल्यास जीवन फार सुंदर होते.

तिसरा मेकानिक हा पण मेकानिकल इंजिनियरच. पण नोकरी करता करता तो जोडधंदा म्हणून रिमोट कंट्रोलवर चालणारी छोटी छोटी विमाने बनवे. त्यातील काही तर चक्क “टार्गेट प्रेकटीस” करण्यासाठी भारतीय सैन्याने विकत घेतली असे मी ऐकले आहे. माणूस तसा लई हुशार, पण सिगरेट ओढायचा (वयाच्या केवळ तेविसाव्या वर्षी.) जर्मन भाषा शिकणे त्याला खूप जड जाई पण जर्मनीला जाऊन तेथील टेक्नोलॉजी बघणारच या ध्येयाने तो पेटला होता. आपल्याला भाषा जमत नाही हे पाहून त्याने रोज सर्वाना आपल्या घरी ग्रुप स्टडी साठी बोलावणे सुरु केले. याचा त्याला चांगला फायदा झाला, आणि तो परीक्षा चांगल्या मार्कांनी पास देखील झाला. आज तो जर्मनीत उच्चशिक्षण घेत आहे.

आता माझा या तिघांशीही संपर्क तुटला आहे कारण कामापायी तिघानाही सोशल मिडिया वर गप्पा मारण्यास वेळ नाही, आणि मला पण त्यांच्या विषयातील फार काही काळात नाही. असो. "इंजिनियरच्या परिस्थितीतून बोध घेऊन उगाच पैशासाठी नावडते क्षेत्र निवडण्याची चूक मी केली नाही. आज माझ्याकडे पैसा कमी आहे हि गोष्ट मी मान्य करतो  पण एक दिवस खूप प्रसिद्ध आणि श्रीमंत लेखक होईन आणि त्या चित्रकारासारखा जगभर फिरत राहीन असे स्वप्न मात्र मी कायम उराशी बाळगून आहे. 

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी