त्रिशंकू

कॉलेजमधून बाहेर पडलेल्या आणि नवीन नोकरीला लागलेल्या प्रत्येक तरुणासाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला पुढची वरच्या पगाराची नोकरी शोधण्याची पाळी न येता त्या नोकरीची ऑफर येणे. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मान आणि जास्त पैसे मिळणार असतात. पहिली नोकरी आता रेझ्युमेवर एक ‘एक्स्पीरियंस’ बनतो, आणि तुम्ही ऑफिसमध्ये ‘सिनियर’ बनण्याच्या दिशेने पाहिलं पाउल टाकता.
मात्र इथे तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नसतो, पुढे जबाबदाऱ्या वाढणार असतात आणि असंख्य तडजोडी कराव्या लागणार असतात या गोष्टी तुम्ही वाढत्या पगार आणि स्टेटसच्या मोहापायी विसरून जाता.
नेमकी हीच चूक मी पण केली.

अंतरराष्ट्रीय राजकारणात मला असलेली रुची पाहून बोधीसत्वांनी स्वतः “अकलेचे तारे” या ते नव्यानेच संपादक बनलेल्या मराठी दैनिकात जागतिक बातम्या देणाऱ्या विभागाचा उपसंपादक म्हणून नोकरी ऑफर केली, आणि मोठ्या पगाराला भुलून मी ती तत्काळ स्वीकारली. इंग्लिश चेनल सोडून आता मी मराठीत शिरलो, आणि अक्षरशः अंधारात चाचपडू लागलो.

ग्रामीण “भारत” आणि शहरी, “इंडिया” अशी एक मोठी दरी आपल्या देशात असल्याचं प्रसारमाध्यमे सांगत असतात. त्या दरीच्या मधोमध मी अडकलो आणि जीवाची प्रचंड घुसमट सुरु झाली. हे एका मराठी दैनिकाचे ऑफिस होते. इथले बरेचसे लोक ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले होते, आणि ते तीन महाभयंकर पापे करत होते
१. माझा ब्लॉग न वाचणे.
२. माझ्या विनोदांवर अजिबात न हसणे.
३. नो इंग्लिस

इथे माझी जाम पंचाईत व्हायची. विद्यापीठातून बाहेर पडल्या-पडल्या इंग्लिश चेनलमध्ये दोन वर्षे काढल्याने ती भाषा माझ्या अंगात पक्की मुरली होती. बोलण्यात वाक्या-वाक्याला इंग्लिश वाक्प्रचार आणि लोकप्रिय इंग्लिश मालिकांचे संदर्भ यायचे, पण ते ऐकून माझ्या नव्या सहकाऱ्यांच्या चेहेर्यावरची माशी देखील हलत नसे. त्यांच्या आणि माझ्या विचार करण्याच्या पध्दतीत जमीन-आसमानाचा फरक होता.
मी ज्यांची नावे कधीही ऐकली नाहीत अशा मराठी साहित्यिकांच्या पुस्तकांवर ते लोक चर्चा करायचे. जुनी मराठी गाणी गुणगुणायचे, आणि मी जेव्हा त्यांना इंग्लिश सिनेमा, गाणी, कविता यांच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा खो-खो हसायचे. “Wazzup”, “Awsome” असे इंग्लिश शब्द वापरण्याच्या माझ्या सवयीमुळे “फिरंगी” म्हणून माझी खूप चेष्टा व्हायची. मग ते वेगळेपण आणि एकटेपण अंगावर यायचं. इंटरनेटवर शोधून काढलेल्या विविध गोष्टी शेअर करण्यासाठी, जगभरातील वेगवेगळ्या कल्पनांबद्दल बोलण्यासाठी इथे कोणाला वेळाही नव्हता आणि इंटरेस्टही नव्हता. माणसांमध्ये असूनही मी भिंतीनी वेढला गेलो होतो.

आमच्या दैनिकाचं डिजाईन इंग्लिश पेपरप्रमाणे सुंदर, आकर्षक व्हावं म्हणून डिजायनर स्टाफला लवकर येण्याची मी विनंती केली. बरेच वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. गुगल ड्राईव्ह सारखी सोफ्टवेअर वापरून स्टाफमधील समन्वय वाढवण्याचा आणि कामात सहजता आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या मेहेनातीला म्हणावं तसं यश आलं नाही. त्या लोकांना तंत्रज्ञान आणि सोशल मिडीयाचा इतका सोस नव्हता; नव्या गोष्टी करून पाहण्याची जिज्ञासा नव्हती.

या दैनिकात आलो तेव्हा डोक्यात खूप कल्पना आणि डोळ्यात खूप स्वप्न होती, पण इथे प्रचंड कोंडमारा वाट्याला आला. आपल्याला कोण समजून घेऊ शकत नाही म्हणून येणारी निराशा, आणि कामाच्या डेडलाईनपायी येणारं दडपण यामुळे माझ्या आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या. पित्ताचा त्रास बळावला, आणि तो असहाय्य होवू लागल्यावर मी संपादकांना याची कल्पना दिली.
“मी तुझी परिस्थिती समजू शकतो” बोधिसत्व उत्तरले. “पण यात दोष ना तुझा आहे, ना तुझ्या सहकार्यांचा.”

“इथे काम करणारे लोक हे गावाकडून आलेले आहेत. आयुष्याच्या पास्तीशिपर्यंत खूप खडतर परिस्थितीस तोंड दिल्यामुळे जगाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनात काहीसा कडवटपणा आला आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे नवीन काही करून पाहण्यापेक्षा जगणे, तगून राहणे याला त्यांच्या लेखी जास्त महत्व आहे. म्हणूनच वृत्तपत्रात काहीतरी नवीन प्रयोग करण्यापेक्षा डेडलाईनच्या आत काम संपवून “सुरक्षित” राहण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो.” संपादकांनी माझी समजूत काढली.

“मी तुला चांगली दहा दिवस सुटी देतो. शरीर आणि मनाला थोडा आराम दे. हे सांस्कृतिक वातावरण, हि नोकरी आपल्या पिंडासाठी बरोबर आहे का, असा प्रश्न तुला पडला असेल. त्यावर निवांतपणे उत्तर शोध. आणि हो, यावर मला एक चीनी म्हण आठवली...
जर आपण आपला मार्ग बदलला नाही, तर जिथे चाललो आहोत तिथेच जाऊन पोचू.
तू कुठे चालला आहेस त्याचा विचार कर.”

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी