बोधिसत्व

“अनलर्निंग हा नवनिर्मितीचा पाया आहे”

हे शब्द माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहेत. कोणत्याही नव्या समस्येला सामोरे जाताना अथवा नवीन काही निर्माण करताना यापूर्वी आपण जे काही शिकलो, आपल्या परिस्थितीबद्दल ज्या काही अपेक्षा आणि आडाखे आहेत ते सारे विसरून नव्या दृष्टीने प्रत्येक प्रश्नाकडे बघता यायला पाहिजे. ही गोष्ट मी आमचा महान न्यूज चेनल मध्ये माझ्या दोन वर्षाच्या कार्यकाळात शिकलो.

हे नवनिर्मितीचं तत्व केवळ दोन टप्प्यांच्या सोप्या प्रोसेस मध्ये उलगडतं. पहिला, एखाद्या न्यूज किंवा फिल्म स्टोरीच्या कंटेंटबद्दल लोकांच्या काय अपेक्षा असतील त्यांची एक यादी बनवायची. आणि दुसरा, त्या अपेक्षांच्या पलीकडचे काहीतरी निर्माण करायचे. माझा बॉस, आमच्या महान न्यूज चानेलचा संपादकांनी या गोष्टी मला सांगितल्या. आज तोच विचार माझ्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे.

आपण कुठे चाललो आहोत याचा त्यांना उत्तम अंदाज होता. आजच्या जगात प्रेक्षक अधिक सजग झाला आहे, आणि निव्वळ करमणूकीपेक्षा ‘इन्फोटेन्मेंट’ हीच माहितीच्या युगात प्रेक्षकवर्ग धरून ठेवण्याची गुरुकिल्ली आहे असं त्यांचं मत होतं. त्याचबरोबर आपल्याला मिळणाऱ्या माहितीचा झरा वाहत ठेवण्यासाठी माणसे जोडावी लागतात. अशा माणसांचं एक मोठं जाळं निर्माण करावं लागतं. माणसं जोडण्याची आणि जपण्याची त्यांना फार चांगली हातोटी आहे आणि त्या महत्वाचा वाटा आहे तो त्यांच्या अत्यंत प्रेमळ आणि मावळ स्वभावाचा. फायद्यापाठी पाळणाऱ्या कोर्पोरेट जगात अशी माणसं फार कमी असतात.

हे संपादक स्वतः खूप हुशार असले तरी आपल्या हाताखालच्या सामान्य लोकांच्या टीमला आपल्या कल्पना समजावून देण्यासाठी मात्र त्यांना खूप धडपड करावी लागते. एकेकाळी गोवा एन्टरटेनमेंट सोसायटी सारख्या तगड्या संस्थेचा भाग असणारा, मोठमोठ्या सरकारी बाबूंना नवनवीन कल्पना यशस्वीरीत्या ‘पिच’ करणारा हा माणूस आज वृत्तपत्राच्या माध्यमातून सामान्य वाचकांना काहीतरी वेगळे द्यायचा प्रयत्न करतो आहे, पण ते किती जणांना समजेल आणि भावेल हा प्रश्न आहे.

काहीवेळा त्यांना काय सांगायचे आहे ते त्यांच्या हाताखालच्या लोकांना अजिबात कळत नाही पण त्यावर चिडण्याऐवजी हे संपादक महाशय आपल्याच परिस्थितीला मिशीतल्या मिशीत हसतात. मात्र त्यांच्या त्या हसऱ्या चेहेर्यावरच्या गोल काळ्याभोर डोळ्यामधली उदासीची झाक लपत नाही. राजकारण, ऑफिस पोलिटिक्स, दगाबाजी, असल्या असंख्य जखमा या माणसाने झेलल्याची साक्ष देणारे, काळ्या वर्तुळानी वेढलेले, आणि तरी मायेने ओतप्रेत भारलेल ते डोळे का कोण जाणे मला खूप अस्वस्थ करतात. त्यांच्याकडे पाहिलं कि अनेक घाव सोसूनही अविचल असणाऱ्या बुद्धाच्या अंशाची  आठवण होते आणि म्हणूनच त्या अचल अवताराचे टोपणनाव मी त्यांना दिले आहे.
बोधिसत्व

व्यक्तिमत्व सौम्य असले तरी त्यांचा रुबाब आणि अंगी बाणलेली शिस्त त्यांच्या बॉस असण्याची समोरच्याला जाणीव करून देतात. व्यवस्थित विंचरलेले केस, लांब हाताचा कडक इस्त्रीचा शर्ट (ज्याची इस्त्री दिवसभरात कधीच मोडत नाही) तेच ते वर्षानुवर्षे वापरत असलेले जुने रोलेक्सचे घड्याळ अशा थाटात सकाळी नऊच्या ठोक्याला ते ऑफिसमध्ये येऊन आपल्या खुर्चीत बसले की उन-सावलीच्या खेळत मस्त रंगलेल्या आणि प्रत्येक वस्तू व्यवस्थित मांडून ठेवलेल्या त्यांच्या डेस्कसहित ते एका सुंदर रेखीव चित्राचा भाग बनून जातात. त्यानंतर मग “नमस्कार, आज काय दिवे लावणार आहात रे तुम्ही?”  असे मिश्कील प्रश्न वार्ताहरांना विचारात त्यांच्या दिवसाची सुरुवात होते.

पूर्वी “आमचा महान न्यूज चेनल” या इंग्लिश चेनल मध्ये काम करताना मी त्यांना फार जवळून पहिले. आजच्या बदलत्या जगात सनसनाटी गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा दर्जेदार गोष्टी दाखवून दर्जेदार असा एकनिष्ठ प्रेक्षकवर्ग तयार करण अधिक उत्तम या तत्वाला धरून ते काम करायचे, पण मराठी वृत्तपत्रात गेल्यावर मात्र त्यांची भाषाच बदलली.

“वाचकांना उगाच फार ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. आपलं लक्ष ‘मार्केट’ वर असलं पाहिजे. राजकीय भूमिका काहीशी मावळच ठेवा आणि वाचकांना आवडेल असा मजकूर द्या.”
हे म्हणजे स्वतःच्या तत्वांना काळिमा फसण्यासारखं होतं, आणि मी जराही भीडभाड न ठेवता त्या अचल हिमकड्याला याबद्दल विचारलं. एखाद्या बौध्द भिख्खूला साजेल अशा शांतपणाने त्यांनी माझं म्हणण ऐकून घेतलं आणि नंतर संयमित आवाजात या निर्णयामागील कारण सांगितलं .

“मराठी वृत्तपत्राचा अधिकसा वाचकवर्ग हा ग्रामीण आहे ग्लोबलायझेशनच्या झंझावातपासून अजून काहीसा दूर असलेला हा वर्ग इंटरनेट, इंग्लिश भाषा यांच्या प्रभावामुळे हळू हळू कमी होतो आहे. असे वाचक टिकवून ठेवण्यासाठी काही काळ तरी आपलं कंटेंट सरळ, साधं आणि लोकल ठेवावं लागेल. डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्या अफाट कल्पना इथे राबवण्यासाठी अजून काही वर्षे जावी लागतील. कदाचित ते काम माझ्या नाही, तुझ्या पिढीला करायचं आहे.”

बोधिसत्व असं म्हणत असले तरी आपल्या वृत्तपत्रात काहीतरी वेगळे प्रयोग करण्याचं त्यांनी सोडलं नव्हतं. संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे साजऱ्या केल्या जाणाऱ्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय दिवसांसाठी त्यांनी एक पान राखून ठेवलं होतं. इतर वृत्तपत्रे जशी सिनेमातील तारे तारकांना वाहिलेले सदर छापतात त्या जागी आमचे वृत्तपत्र मात्र देशोदेशीचे राजे, राण्या, उमराव, अशा गोष्टींबद्दल माहिती देत असे.

ते फार हुशार आणि दूरदर्शी टीम लीडर आहेत पण कधीच आवाजात जरासुध्दा जरब न आणण्याची त्यांची वृत्ती फार नुकसानकारक आहे. खूप वरचे अधिकारी त्यांच्या ज्ञान आणि अनुभवला आदर देऊन त्यांचे म्हणणे ऐकतात पण कोर्पोरेट शिडीच्या तळाशी असणारे उर्मट कर्मचारी त्यांच्याकडे सरळ कानाडोळा करतात.
बोधीसत्वांना माणसांची चांगली पारख आहे, प्रत्येकाची योग्य जागा कुठली याची जान आहे पण माणसाना ‘कंट्रोल’ करणं त्यांना कधी जमत नाही. मग स्वभावाने काहीश्या कडक असलेल्या सह-संपादकांवर आरडाओरडा करून लोकांना सरळ करावे लागते. साहेबांनी दिलेल्या पूर्ण स्वतंत्र्याचा डोळसपणे उपयोग कसा करावा हे जर त्यांच्या हाताखालील लोकांनी लक्षात घेतलं असतं तर बोधिसत्वांसहित सर्वांचा फायदा झाला असता.

आताच्या जगात जनमानस ओळखण्यासाठी सोशल मिडीयावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे हे जाणून ऑफिसमध्ये सोशल मिडियावर बंदी घालण्यापासून व्यवस्थापनाला परावृत्त करण्यासाठी बोधीसत्वांनी जीवाचे रान केले. पण त्यांच्या स्टाफमधील किती लोकांनी सोशल मिडीयाचा उपयोग उपयुक्त अशी नवी माहिती जाणून घेण्यासाठी केला हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

त्यांच्या विचारांनी आणि काम करण्याच्या पध्दतीने अनेक वृत्तपत्रे आणि चानेलची भरभराट झालेली मी पाहतो तेव्हा या मनुष्याला अनुभवी संपादकाला साजेशी आक्रमकता किंवा स्वतःचे काहीतरी उभे करण्याची महत्वाकांक्षा का नसावी असा विचार करून मन खिन्न होते.

सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव पाहून ट्विटर आणि फेसबुकचा उपयोग ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळवण्यासाठी करावा असे मी बोधीसात्वांना सुचवले. “फार चांगली कल्पना आहे हि” गालातल्या गालात हसत संपादक म्हणाले. “पण माझ्या लोकांना पटकन नेमक्या बातम्या शोधून काढण जमण कठीण आहे. असं काही करायचं तर आपल्याला अजून थोडे ‘सोफेस्टीकेटेड’ आणि जलद गतीने विचार करू शकणारे लोक पाहिजेत. आम्ही इतक्यात ते करू शकत नाही.”

या उत्तराने नाउमेद न होता मी त्यांना अजून एक आयडिया सुचवली ती म्हणजे फक्त नवनवीन कल्पना लढवून वृत्तपत्रात वेगळे प्रयोग करायला एक “इनोवेशन ऑफिसर” नियुक्त केला तर? त्यावर मग “अशा गोष्टी मोठमोठ्या कोर्पोरेशन्सनाच परवडतात . मर्यादित बजेट असलेले गोव्यातील मराठी हि त्यासाठी योग्य जागा नव्हे.” असे मला ऐकून घ्यावे लागले.

अनेक ठिकाणी अनेक माणसांबरोबर काम केल्यामुळे बोधिसत्वांच्या स्वभावात एक विचित्र सावधपणा आला आहे. इतरांना मोकळेपणा देत असले तरी ते स्वतः कधी मोकळेपणाने बोलत नाहीत. शिळोप्याच्या गप्पा, लोकांवर तोंडसुख घेणे, विघ्नसंतोषीपणा अशा जीवनात निर्भेळ आनंद देणाऱ्या गोष्टी त्यांना माहित नाहीत. एक ते मिशीतल्या मिशीत हसणं सोडलं तर इतर कुठले भावही त्यांच्या चेहेर्यावर दिसत नाहीत. स्टाफकडून काही चूक झाली तर “अरेरे. काम वाढवलंस कि तू.” या पलीकडे प्रतिक्रिया नाही आणि कोणी काही अचाट करून दाखवलं तरी मंद हसत “हे चांगलं चाललंय तुमचं” यापलीकडे अधिक प्रशंसा नाही. असं एखाददुसरं वाक्य फेकून ते पुन्हा आपल्या स्टाफला त्या कडक सह-संपादकांच्या हवाली करतात आणि पुढ्या कामाला लागतात.

त्यांच्या मावळ स्वभावामुळे त्यांच्या कित्येक कल्पना व्यवस्थापनाने धुडकावून लावल्या. त्यांच्यासाठी जर ते ठामपणे उभे राहून लढले असते तर आज कित्येक लोकांच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले असते. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा योजनांचे, त्यांचा उपयोग करून स्वतःचा उत्कर्ष साधणाऱ्या तरुणांचे बोधीसत्वांना भारी कौतुक. पण आपल्या कल्पना अशा मारून जाऊ न देता ते त्या स्वतः अमलात का आणत नाही हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी