बॉसिण

“जाऊ द्या हो. लहान आहे तो अजून"

हा संवाद कुठल्या घरातला नसून एका ऑफिसात आहे, आणि खडीसाखरेसारख्या स्पष्ट, खणखणीत पण गोड आवाजातले हे शब्द आहेत एका बॉसिणीचे. तो लहान मुलगा - वय वर्षे तीस, कामाचा अनुभव सात वर्षे- असा मी.

कामात काहीतरी चूक झाल्यावर भडकलेले पेपरच्या डिजाईन टीमचे हेड क्षणभर अवाक झाले. संपादक वगैरे सारखा कितीही मोठा हुद्दा  असला तरी “त्या मेडम” सारखी माणसांमध्ये उगाचच दुरावा निर्माण करणारी विशेषणे मी तिला कधीही लावू शकलो नाही. ती कायम “ती बोसिण” होती आणि आहे.

पत्रकारितेतील माझी आतापर्यंतची सात वर्षे केवळ दोनच बॉसेसच्या हाताखाली सरली, आणि ते दोघेही अत्यंत प्रेमळ आहेत. त्यातील दुसरी आणि सध्याची हि बॉसिण. गव्हाळ वर्णाची, मिश्कील स्वभावाची, हसली कि किंचित गुलाबी छटा असलेल्या गालांना नाजूक खळ्या पडणारी बॉसिण कामात चूक झाली कि ओरड्ण्याऐवजी  “सोडून दे रे, उगाच जिवाला त्रास करून घेऊ नकोस” म्हणत समजूत काढते. तेव्हा मग केवळ तिच्या प्रेमापोटी कामाचा दर्जा उंचावतो. आरडाओरडा करून प्रश्न सुटत नसतात. उलट माणसं बुजतात आणि जास्त चुका करतात. हि आणि अशा अनेक गोष्टी तिनं मला शिकवल्या. चूक झाल्यास आरडाओरडा करू नये, विनम्र वागावं आणि कितीही छोटी गोष्ट असली तरी चांगल्याला चागलं म्हणावं हा बॉसिणीचा दंडक

बाई म्हणून काम आणि घर सांभाळताना बॉसिणीची होणारी धावपळ मी रोज पाहतो. काम करता करता छोट्या मुलीला शाळेत सोडणे, घरी आणणे, भरवणे, खेळवणे, मध्ये बिझनेस रिव्यू मीटिंग, इतके सारे करूनही तिला केलेल्या कामाची पोचपावती फार कमी लोक देतात. दोन दोन आघाड्यांवर लढताना केलेली धडपड कोणी ‘recognise’ करत नाही. पण दिवसरात्र धडपडणाऱ्या, बॉसिणीच्या काळ्या वर्तुळानी वेढलेल्या डोळ्यात मात्र तिच्या टीमसाठी अपार कौतुक भरलेलं असतं.  पिंपळाच्या काळ्या काळ्या सुकल्या पानातून झिरपणाऱ्या उन्हासारख दुःखाच्या सावलीतून सुद्धा चमकणारं निर्मळ कौतुक. संध्याकाळ झाली कि “थकला असशील आता, जा घरी” असं मला सांगत स्वतः एकीकडी मिटींगची आणि दुसरीकडे स्वयपाकाची तयारी करणाऱ्या  बॉसिणीसाठी आपण जास्त काही करू शकत नाही असं वाटून काळीज तुटत राहतं.


या चुका मग मी आपल्या बायकोच्या बाबतीत सुधारतो. कामात काहीतरी मदत करायचा प्रयत्न करतो. तिथेही मला फारसे काही जमत नाही, पण एक महत्वाची गोष्ट मात्र मी करतोच करतो.

कधी जेवण बनवण्यात बायकोची चूक झाली आणि तिचे सासू सासरे बोलायला लागले कि मी पण शक्य तितक्या गोड आवाजात म्हणतो

“जाऊ द्या हो. लहान आहे ती अजून"

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी