आमचे इथेच पंढरपूर!

सोशल मीडियाद्वारे असो व प्रत्यक्ष भेटून व बोलून असो, माणसे जोडणे, नेटवर्क निर्माण करणे खूप महत्वाचे आहे असे माझे मत आहे. पण आज समृद्ध जीवन म्हणजे नेमके काय याच्या बदलत्या कल्पनांमुळे माणसे जोडणे सहज सोपे असले तरी ती टिकवून ठेवणे कठीण होत चालले आहे. आज लोक करियरपाठी पळत गोव्याहून दिल्ली आणि तिथुन पुढे वॉशिंग्टनला निघून जातात पण या नादात जुने शाळूसोबती, नातेवाईक, आई-वडील अशी माणसे आणि त्यांचा आधार तुटत जातो.

असे पैशापाठी पाळण्यापेक्षा आपण निवांत एका जागी राहावे असे मला वाटते. मग आपल्याला एक दिवस अचानक शोध लागतो कि शाळेत आपल्या शेजारी बसणारा, आपल्या डब्यातले चोरून खाणारा मित्र दशकभरानंतर आज पोलीस इन्स्पेक्टर झाला आहे, आपल्याला कायम नोट्स उसने देणारी पुढल्या बाकावरील सुंदरी बँकेत जुन्या ओळखीवर पटकन आपली कामे करते आहे, आणि आपण रोज ऑफिसात जायला जी बस पकडतो त्याचा चालक दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या कॉलेजमध्ये शेवटच्या बाकावर बसून सर्वांची करमणूक करणारा त्या वेळचा ’कूल ड्यूड’ आहे. पैसा दिसेल तिथे उठून जाण्याने अशी संपर्कांची शक्तिशाली  ’नेटवर्क' आपण निर्माण करू शकत नाही. आता कोणी म्हणेल कि फेसबुक, व्हाटसअप मुळे सगळे लोक संपर्कात उरतात -पण तसे ते केवळ संपर्कात राहतात. रोज भेटून, बोलून, तो संपर्क घट्ट करता येत नाही.

दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी कॉलेजपासून आपल्यासोबत टिकून असलेल्या  त्या जुन्या मित्राकडे मन मोकळं करण्यासारखा दुसरा आनंद नाही. म्हाताऱ्या आईबापांना कुठल्यातरी मेट्रो सिटीतून त्यांना भरपूर पैसे पाठवून ”आय एम विथ यु” असा मेसेज पाठवण्यापेक्षा त्यांचा   भार हलका करायला त्यांचा जवळ असणं, आणि आपल्या प्रगतीवर रोज त्यांनी केलेलं कौतुक प्रत्यक्ष अनुभवण, हे कधीही अधिक  चांगलं.

आपली सुखदुखः वाटून घेतल्याने जीवनातला आनद वाढतो असं सगळे म्हणतात. अशी वर्षानुवर्षे वेळ देऊन घडवलेली जुनी नाती सोबत असली कि आपलं जीवन खरंच सुखी होतं कारण कोणतीही समस्या आली कि आपण जोडलेली हि माणसं पटकन मदतीसाठी येतात. जुनी नेटवर्क उभी असली कि आपण अधिक लवकर सावरून पुन्हा उभे राहू शकतो. त्याचबरोबर इथून तिथे फिरत राहिलो कि  नवीन जागा, समाज, संस्कृतीशी जुळवून घेण, त्यादरम्यान बसणारे छोटे छोटे धक्के, एकीकडे करियर सांभाळताना दुसरीकडे नव्या जागी रुजायचा प्रयत्न यात आपली खूप मानसिक  व शारीरिक शक्ती खर्च होते. याउलट एका जागी राहिल्याने आप शांतपणे आपल्या ’कोर' कामावर लक्ष केंद्रित करू शकतो. एका जागी स्थिर राहिल्यास ‘कल्चर शॉक’ ला तोंड देण्यात आपली शक्ती वाया जात नाही आणि काही समस्या आल्यास आपली माणसे चुटकीसरशी त्या सोडवून देतात.

एका जागी राहिल्यास आपल्याला लवकर लवकर तुफान पैसा मिळणार नाही पण आपली माणसे जवळ असल्याने कमालीची मानसिक शांतता आणि
सुरक्षित व समाधानी जीवन मिळेल. यापैकी आपल्याला काय हवे ते आपल्याला तारुण्यातच ठरवायचे आहे कारण अशी नाती निर्माण करायला प्रचंड वेळ लागतो आणि तो आपल्याला आतापासून द्यावा लागणार आहे.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी