D.O.E. (डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश)

“क्रिएटीव रायटिंगचा अभ्यास करताना मला  राज्यशास्त्रातील कोरड्या सिध्दांताहून वेगळं काहीतरी शिकण्याची आणि स्वतःच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याची संधी मिळेल.” गोवा विद्यापीठाच्या इंग्लिश विभागात सर्जनशील लेखनाच्या वर्गात प्रवेशासाठी केलेल्या अर्जात मी लिहिलं होतं.

माझ्या मते क्रिएटीव रायटिंग केवळ एक पोरखेळ होता. किचकट सिध्दांत नाहीत,  गुंतागुंतीचे तह, शिखर परिषदा लक्षात ठेवण्याचा त्रास नाही; काहीतरी अचाट काल्पोकाल्पित कथा खरडून दिल्या कि झालं! राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्याकडे धोकेबाज राजकारणी आणि गुप्तहेरांच्या सुरस कथांचा भरपूर साठा होता. त्याच्या बळावर या इंग्लिश विभागातल्या कविता आणि नाटकं वाचणाऱ्या आणि परीकथांमध्ये रमणाऱ्या लोकांना मी सहज मात देईन असा मला विश्वास होता. आपलं मूळ क्षेत्र  सोडून इथे भलतीकडे घुसून आपण मोठी चूक करत आहोत हे माझ्या गावीही नव्हतं.

या चुकीचं गांभीर्य माझ्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. इंग्लिश विभागातील माझी कामगिरी शेक्सपिअरच्या शोकांतीकेप्रमाणे दिवसागणिक करुण होत चालली होती. आमच्या राज्यशास्त्र विभागात एक गोष्ट आम्हाला पक्की शिकवली होती. जगात बरीचशी अस्थिरता निर्माण करण्यामागे केवळ एका सरकारी विभागाचा हात असतो – अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, अर्थात, कुप्रसिद्ध D.O.D. या इंग्लिश विभागानं माझी मनःशांती भंग करून माझ्या जीवनात बरीच अस्थिरता निर्माण केली होती. त्यामुळेच या विभागाचं माझ्या डायरीत टोपणनाव पडलं महाभयंकर D.O.E.

माझ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या ज्ञानाच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लिश विद्यर्थ्यांनी प्रयोग सुरु केला तो  सुमधूर आणि नेमक्या फ्रेंच, ग्रीक आणि लेटीन वाक्प्रचारांचा. त्यांच्या आणि माझ्या इंग्लिश भाषेत जमीन-अस्मानाचा फरक होता. मी केवळ एक शब्दांचा किरकोळ विक्रेता होतो तर हे लोक महाराष्ट्रातल्या साखर-सम्राटांसारखे शब्दांच्या कारखान्याचे शब्दासाम्राट. या भाषा विभागातील लोकांची विचार करायची पद्धत आम्हा पोलिटिकल सायन्सवाल्यांपेक्षा फार वेगळी होती. हे लोक कुठले कुठले अवजड शब्द आणि लेटीन वाक्प्रचार फेकत काय बोलायचे तेच मला धड काळात नव्हतं मग त्यंच्या लेखनाची तर बातच नको. जिथे विद्यार्थ्यांनाच समजून घेण्यात मला अडचणी येत होत्या, तिथे प्रध्यापिकेची तर बातच नको!

त्यांच्यामध्ये मी म्हणजे जणू एक साधा मंदिराचा पुजारी जो चुकून कासिनोत घुसला होता, पण तरी हिम्मत करून ‘नो लिमिट्स’ टेबलावर खेळ मांडून सर्वस्व पणाला लावून बसला होता. इतर खेळाडूंना खेळाचे सारे बारकावे अवगत होते. कविता, नाट्य वगैरे सर्व इथे लिहिलं जात असलं तरी क्रिएटीव रायटिंग कोर्सचा खरा गाभा म्हणजे कथालेखन. बाकी नाटकं वा कविता मला जमत नसल्या तरी या एका क्षेत्रात मी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना टक्कर देऊ शकेन अशी माझी अटकळ होती.

त्यंच्या कथांच्या नावामधुनच एक भावनाशीलता टपकत होती. त्यांनी लिहिलेल्या काही कथा पहा: “दैवाचे खेळ.” (शोकांत प्रेम कथा) “सुवर्णमध्य” (नात्यातील गुंतागुंतीवर आधारित लघुकथा) “काऊ आणि चिऊ” (बालकथा)
याउलट वास्तव जगातील घडामोडींनी भरलेल्या माझ्या काही कथा : दहशतवाद्यांचे खेळ (आंतरराष्ट्रीय सूडकथा) “मध्यपूर्व” (रोमांचक युध्दकथा) “कावेबाज चीन” (सुरस हेरकथा)


माझ्या या अंत्यंत वास्तववादी कथांनी प्रभावित व्हायचं सोडून उलट प्राध्यापिका माझ्यावर चिडल्या आणि त्यांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलावलं.

“हे बघ,” त्या मला म्हणाल्या “तुमच्या राज्याशास्त्रातले गनिमी कावे इकडे इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये आणू नकोस. हा सर्जनशील लेखनाचा वर्ग आहे. इकडे सौंदर्य, तरलता आणि कल्पनाशक्ती लागते पण तू या सुंदर कलेला हिंसा आणि क्रौर्यात हरवून टाकतोस. इतकंच नाही, तुला अगदी अप्रासंगिक गोष्टींमध्ये हिंसा मुद्दाम घुसवायची सवय आहे! हि सवय जात नसेल, तर एक तर मानसोपचार तज्ञाचा सल्ला घे, किंवा माझ्या क्लासमध्ये येणं बंद कर.”


आपल्या लेखनाच्या टेलंटवर माझा फार विश्वास होता. त्यामुळे मी या दोनही सूचनांकडे सरळ काणाडोळा केला.
अशातच एक दिवस बाईंनी क्लासला एक खास प्रोजेक्ट दिला. आम्हाला एक सुखांत प्रेम कथा लिहायची होती पण दोन महात्वाचे मुद्दे अगोदर देण्यात आलेले होते. पहिला: कथा ब्रिटीशकालीन भारतात घडते. दुसरा: मुलाचा बाप विलन असतो.

इंग्लिश विद्यार्थ्यांनी फार कल्पक कथा लिहिल्या होत्या. कोणी मुलाची आईच जोडप्याची पळून जायला मदत करताना दाखवली होती, कुणी मुलगी मुलाला पळवून नेते असं दाखवलं होतं तर कोणाच्या कथेत गावच्या तळीजवळ ज्या झाडाखाली हे दोन प्रेमी भेटतात (आणि गप्पा व त्याही पुढे जाऊन इतर बऱ्याच गोष्टी करतात) ते झाड कुठल्यातरी जादूने मनुष्यरूप घेऊन त्या दोघांची मदत करत होतं.

माझी कथा काहीशी अशी होती.

कथेचा नायक एक अत्यंत हुशार आणि चाणाक्ष मनुष्य असतो. त्याचा बाप स्वातंत्र्यसैनिकांना मदत करत असतो. आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या बापाचा काटा काढण्यासाठी तो मुलगा सरळ ब्रिटिशांशी एक सौदा करतो – तुम्ही या प्रेमप्रकरणात माझी मदत करा, त्या बदल्यात बापाला गजाआड करण्यात मी तुमची मदत करेन ! अशा प्रकारे तो मुलगा आपल्या अक्कलहुशारीच्या बळावर आपलं प्रेम सफल करतो, आपल्या कडक बापापासून मुक्ती मिळवतो, हेर खात्यात चांगली सरकारी नोकरी मिळवतो, आणि सुखी संसार करत पुढे स्वतंत्र भारतात मोठा गुप्तहेर अधिकारी बनतो.

अशी हि अत्यंत सुंदर आणि सुखी अंत असलेली प्रेम कथा होती.

ती कथा मी बाईंना सबमिट केली आणि समाधानानं घरी गेलो. माझी कथा सर्वात वेगळी होती. त्यामुळे उत्तम मार्क मिळण्याची आशा करत मी दुसऱ्या दिवशी आनंदाने वर्गात पाउल ठेवलं. पण बराच वेळ झाला तरी बाई यायची चिन्हं दिसेनात. तासभर बाईंची वाट पाहून मी शेवटी इंग्लिश विभागाच्या ऑफिसमधल्या क्लर्कपाशी चौकशी केली.

“बाई आज सुटीवर आहेत.” कारकून उत्तरला. “त्यांचा जुना डिप्रेशनचा आजार बळावला आहे. कुठल्यातरी दुष्ट विद्यार्थ्याने त्यांना खूप हिंसक साहित्य वाचायला दिलं म्हणे. आता त्या मानसोपचार तज्ञाकडे गेल्यात.”
बस्स. यानंतर यापुढे इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये पुन्हा न दिसण्याचा निश्चय करून मी चालू लागलो.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी