विद्यार्थ्यांच्या आत्म्हत्याना जवाबदार कोण?



विषय गंभीर आहे. प्रस्तावनेत वेळ वाया न घालवता सरळ मुद्यावर येतो.
आपल्या शाळा-कॉलेजमधले तरुण विद्यार्थी आत्महत्या करतायत. कोमल काळ्या उमलण्यापूर्वीच खुडल्या जातायत. का होतंय असं?

मला वाटतं या प्रश्नाला दोन कंगोरे आहेत. पहिला, आपण फॉरमल शिक्षणाला दिलेलं अवाजवी महत्व. जर एखादा माणूस शाळा-कॉलेजात गेलाच नाही किंवा त्यातील परीक्षेत यशस्वी झाला नाही तर तो “ढ”, निकामी असं आपण समजतो. यावर उपाय म्हणून आठवीपर्यंत पास करा, अभ्यासाचा बोजा कमी करा वगैरे उपाय करून झाले पण तरी आत्महत्या थांबत नाहीत. याचं कारण आपण दुसऱ्या बाजूकडे लक्ष दिलेलं नाही. तो दुसरा आस्पेक्ट आहे पालक, शिक्षक आणि कमकुवत मनाचे विद्यार्थी.

शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक आणि घरी पालक विद्यार्थ्यांना काय सांगत असतात?

“एवढे कमी मार्क? तुझ्यात काही अर्थच नाही.”
“नीट अभ्यास केला नाहीस तर कोणी नोकरी देणार नाही तुला”
“तुला काय माहिती? बाहेरच्या जगात जगणं खूप कठीण असतं.”

अशी वाक्य जर सतत कानावर पडत राहिली तर कुणाला वाटेल उत्साहाने अभ्यास करावासा? जगणं कठीण असतं हेच मनावर बिंबवलं गेलं तर का जगावसं वाटेल कुणालाही?

याउलट आपण दुसरं उदाहरण पाहू. “Privilege” या आपल्या पुस्तकात प्रसिध्द समाजशास्त्रज्ञ शम्स खान समाजातील उच्च वर्गातली मुले कशी घडतात याचे उदाहरण देतात. उच्चभ्रू शाळांमधील कुठल्या गोष्टी आपण इतर शाळांमध्ये देखील आणू शकतो यावर बोलताना ते अमेरिकेतील सेंट पॉल सारख्या उच्चभ्रू, श्रीमंत शाळा मुलांचा अटीट्युड कसा घडवतात ते दाखवून देतात. ते म्हणतात कि ही मुले सभोवताली कायम चांगल्याच गोष्टी बघतात. त्यांना त्यांच्या मर्यादांचे नाही तर बलास्थानांचे स्मरण करून दिले जाते. अडचणींकडे चेलेंज म्हणून बघा, साधने नाहीत, तर ती निर्माण करा हे त्यांना सांगितले जाते. त्यामुळे जगाकडे नियमांनी बांधलेली गोष्ट म्हणून न बघता मोकळे मैदान म्हणून बघायला त्यांना शिकवले जाते. त्यामुळे आपण काहीही करू शकतो असा विश्वास मुलांमध्ये निर्माण होतो. हि गोष्ट इतर शाळांनी देखील केली पाहिजे असे ते म्हणतात.  अर्थात खान साहेब हेही सांगतात कि या श्रीमंत शाळा मुलांना लागेल त्या सुविधा चटकन पुरवतात त्यामुळे कोणतीही गोष्ट करणे अशक्य आहे हे या मुलांना माहीतच नसते!

आता तुम्ही म्हणाल कि या श्रीमंत लोकांच्या पैसेवाल्या शाळा विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड पैसे इनवेस्ट करतात, ते आपल्याला कुठं जमायचं? पण माझा मुद्दा आहे अटीट्युड.
“आपण काहीही करू शकतो” हा अटीट्युड असलेले साधे लोक सुध्दा काय करू शकात याचे एक उदाहरण पाहू. हि गोष्ट आहे इस्राईल देशातली. त्या दिवसातली जेव्हा दुसऱ्या महायुध्दात सर्वस्व गमावलेले ज्यू लोक पेलेसटाइन मध्ये येऊन थडकत होते इस्राईलच्या स्वातंत्र्यासाठी तुंबळ युद्ध चालू होतं, शेजारच्या पाच अरब देशांनी एकदम  इस्राईल वर आक्रमण केलं होतं आणि मनुष्यबळ खूप कमी असल्याने पराभव समोर दिसत होता. पण त्याही परिस्थितीत देशाचे पहिले पंतप्रधान डेविड बेन गुरीअन गरजले “माझा आपल्या शक्तीवर विश्वास आहे, आपली शक्ती वाढते आहे, आणि जसजशी ती वाढत जाईल, तसतसे आंतरराष्ट्रीय राजकारण आपल्या बाजूने झुकेल.” ("I believe in our power, in our power which will grow, and if it will grow, agreement will come...”-David Ben Gurion)

त्यांनी घातलेल्या पायावर आज किती बलशाली राष्ट्र उभे राहिले ते आपण पाहतोच.

हा अटीट्युड आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यायला हवा. आपण काय करू शकतो, आपण काय करावं हे ही ब्रिटिशांनि तयार केलेली सिस्टम ठरवू शकत नाही, ते आपण ठरवतो. झालो फेल शाळेत, तर होमस्कुल सारखे वेगळ्या पध्दतीने शिकण्याचे मार्ग आहेत. झालो फेल कॉलेजात तर मुक्त विद्यापीठातून घेऊ पदवी! अपयश आले म्हणून आपले मित्र व आजूबाजूचा समाज आपल्याला हसतो तर आपण हा समाजच बदलून टाकू! असं होऊ शकतं. उदाहरण आहे तुर्कस्तान: या इस्लामी देशाचा मुस्तफा केमाल अतातुर्क या नेत्यानं कायापालट केला. शिक्षण, वेशभूषा, भाषा, सारं बदललुन टाकलं.

कोण होता तो? एक साधा सैनिक. पण त्याच्या विचारांतून जिद्द भरून वाहते. “जीत त्याची असते जो ‘मी जिंकणारच’ असंच म्हणतो. यश त्याचंच असतं जे कामाला सुरुवात करताना ‘मी यशस्वी होईन’ असं म्हणत सुरुवात करतात, आणि शेवटी ‘मी यशस्वी झालो’ असंच म्हणतात.” (Victory is for those who can say "Victory is mine". Success is for those who can begin saying "I will succeed" and say "I have succeeded" in the end – Mustafa Kemal Ataturk)

असा अटीट्युड आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यायला त्यांना घरातून आणि शाळेतून तसं बाळकडू मिळायला हवं. तुम्ही कसेही असला तरी आम्हाला हवे आहात. या समाजाला चांगल्या आर्टिस्टची, चांगल्या खेळाडूची पण गरज आहे. हवे ते, हवे तसे शिका, हवं ते करा, पण काही तरी काम करा, कारण तुमची आम्हाला गरज आहे, तुमच्या टेलंटला समाजात किंमत आहे, मान आहे, हे जर आपण कोवळ्या विद्यार्थ्यांना शिकवलं तर करतील का ते आत्महत्या?
नाही.

आत्महत्या रोखायच्या असतील तर विद्यार्थ्यांच्या नासानात सकारात्मकता भिनवावी लागेल. त्यासाठी त्यांचा कानावर भरपूर उत्तेजन आणि प्रशंसा पडली पाहिजे. “तुझ्यात काही अर्थच नाही.” “कोणी नोकरी देणार नाही तुला” “बाहेरच्या जगात जगणं खूप कठीण असतं” असली वाक्य त्या कोवळ्या मनावर कोरून ते होणार नाही.

तर शिक्षकानो, पालाकानो, सुधारा. प्लीज.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी