बाबांस पत्र


प्रिय बाबा,


मान्य; तुम्ही जगलात त्याच्या तुलनेत संपन्न असं जीवन मला देण्यासाठी तुम्ही फार कष्ट करता. मान्य; माझं जीवन बाहेरून सुखासीन वाटतं, पण मलाही काही समस्या आहेत.

जरा समजून घ्या.

होय. बरोबर म्हणता तुम्ही. आम्ही नव्या पिढीचे लोक भावना आणि नाती जपण्यापेक्षा प्रेक्टीकल जीवनाला जास्त महत्व देतो. बरोबर म्हणता तुम्ही की आम्ही कन्फ्युज्ड लोक आहोत. तुम्ही आम्हाला शिकवलेली मूल्यं आणि वास्तव जगातील जगण्याची रीत यामध्ये असलेली प्रचंड दरी बघून आम्ही कन्फ्युज होतो. आजूबाजूचा समाज, अर्थकारण, कल्पनेपेक्षाही वेगाने बदलताना पाहून आमचा गोंधळ उडतो. आपली संस्कृती जपण्याबाबत जितके तुम्ही जागरूक आहात, तितकेच आम्ही पण आहोत. मात्र आमचं दैनंदिन जीवन अधिक सुखकर करतील अशा नव्या गोष्टी आम्ही बिनदिक्कत स्वीकारतो.

मान्य; आम्ही कायम फोन आणि इन्टरनेटला चिकटलेले असतो. मान्य; या गोष्टी आमच्या आरोग्याला घातक आहेत. पण बाबा, आज या गोष्टींशिवाय जीवन सुरळीत चालणंच कठीण आहे.

इंटरनेटनं ज्ञानाची अनंत कवाडे खुली केलेली आहेत. त्यामुळे शिक्षणात आणि करियरमध्ये असणाऱ्या उच्च अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. सोशियल मीडियाने आमची विचार करण्याची, संवाद साधण्याची पद्धत आणि समाजाकडून आमच्या असलेल्या अपेक्षा देखिल बदलून टाकल्या आहेत. आम्ही इंटर-कनेक्टेड असलेल्या २१व्या शतकातील जगात वाढलो जिथे प्रत्येक गोष्ट वेळ आणि एकाग्रता आधीच कमी असलेल्या माणसाची उत्सुकता कायम वाढवत नेण्यासाठी डिजाईन केलेली असते. नेमकं हेच आपली शिक्षण व्यवस्था करत नाही.

बाबा, तुमच्या काळात तुम्ही शाळा-कॉलेजात जाण्यासाठी झगडलात; आम्ही चांगला क्रमांक मिळवायला झगडतोय. तुम्ही तुटपुंज्या पगारात घर चालवण्यासाठी झगडलात, आम्ही प्रचंड पगाराच्या, पण दिवसरात्र  राबवून घेणाऱ्या नोकरीतून घरासाठी वेळ द्यायला झगडतोय. साठ-सत्तरच्या दशकातील झापडबंद, तुंबलेल्या स्थैर्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही झगडलात, आता मुक्त अर्थव्यवस्थेतील स्पर्धा आणि अस्थिरतेत टिकून राहण्यासाठी आम्ही झगडतोय. आपल्या सहा भावंडांशी जे काही थोडं थोडकं असेल ते वाटून घेण्यासाठी तुम्ही झगडलात; आम्ही एकेकटी मुलं एकटेपणा आणि डिप्रेशनशी झगडतोय. बालपणी खोडकर मुलगा म्हणून आई-वडिलांची नजर चुकवायला तुम्ही धडपडलात. आता रात्रंदिवस नोकरी करणाऱ्या आई वडिलांचा थोडा वेळ आपल्यालाही मिळावा यासाठी आम्ही धडपडतोय.

माझं जीवन बाहेरून सुखासीन वाटतं, पण मलाही काही समस्या आहेत.

प्लीज , बाबा, जरा समजून घ्या.

तुमचाच
जय

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी