सतीश सोनक, प्राचीन रोम आणि आधुनिक जपान.

सतीश सोनक यांच्या रूपाने गोव्याने अजून एक समाजिक कार्यकर्ता गमावला.

त्यांनी खूप मोलाचे कार्य केले यात वाद नाही, पण हे विचारमंथन त्यांच्यावर नसून समाजाचा अशा कार्यकर्त्यांच्या मला जाणवलेल्या परिस्थिती बद्दल आहे. सोनक जी एकाच वेळी अनेक प्रश्न घेऊन लढत होते. वानरमारे लोकांच्या समस्या, भष्टाचार, व्यसनमुक्ती अशा अनेक आघाड्यांवर ते कार्यरत होते. असे अनेक कार्यकर्ते शेकडो प्रश्न घेऊन जास्तीत जास्त लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यात त्यांची रोमन साम्राज्यासारखी गत होते.

रोमन साम्राज्य आपल्या सैन्याबालावर अनियंत्रित पध्दतीने पसरत गेले. त्यामुळे मग साम्राज्यातील व्यवस्था, दळणवळण, आणि सैन्य यावर प्रचंड ताण आला आणि त्यामुळे राज्याचा लय झाला. आपले सामाजिक कार्यकर्ते असेच शेकडो प्रश्न घेऊन हजारो लोकांची मदत करायला दिवस रात्र धावत असतात. त्यात कित्येक जन आपली तहान भूक, झोप, आरोग्य याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. मग एक दिवस तो ताण असहाय्य होतो आणि मनुष्य कोसळतो.

असे होण्यामध्ये त्या “गरीब, असहाय्य” जनतेचा पण मोठा वाटा असतो. एकदा कोणी मदत करते आहे असे दिसले कि मागचा पुढचा विचार न करता सरळ त्या व्यक्तीपुढे हात पसरले जातात. काही लोकांची मग तीच सवय होऊन जाते. जो आपल्याला मदत करतो त्याचा ताण हलका होण्यासाठी आपणही काहीतरी करावे, आपल्या पीडेवर मात करून आपणही समाजाची सेवा करत त्या कार्यकर्त्याचा भर हलका करावा असे वाटणारे लोक केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच असतात. असे एकाकी लढणारे कार्यकर्ते हे आपले ‘रिसोर्सेस आहेत आणि ते आपण निर्दयीपणे वापरून संपवतो.

हे असे होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनीच आपल्या सेवेवर योग्य ती बंधने घालून घेतली पाहिजेत. त्यांनी प्राचीन रोम सारखे न बनता आधुनिक जपान सारखे बनले पाहिजे.
जपान एक अत्यंत शिस्तबद्ध, शक्तिशाली, आणि तंत्रकुशल देश आहे. पण तो देश आपले शक्तिशाली सैन्य आणि सुरक्षाविषयक तंत्रज्ञान, रोमानंसारखे आपले राज्य वाढवण्यासाठी वापरत नाही (इथे मी केवळ आजच्या, आधुनिक जपान बद्दल बोलतोय. १९४५ पूर्वीच्या नव्हे). अत्युच्च दर्जाचे राहणीमान आणि संरक्षणाचा लाभ मिळणारी जपानी लोकसंख्या खूप कमी आहे. पण हि जी काही लोकसंख्या आहे, ती सर्व बाजूनी समृद्ध आणि सुसज्ज आहे.

खूप लोकांना साधारण सेवा देण्याऐवजी कमी लोकांना उत्तम राहणीमान देऊन सर्व दृष्टीनी सबळ करण्याकडे जपानी साम्राज्याचा कल आहे. जपानी साम्राज्याचा विस्तार प्राचीन रोम प्रमाणे लांबरुंद नाही, तर खोल आहे.
आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप लोकांपर्यंत पोचायचा अट्टाहास न करता कमी, आणि खरोखर मदत करण्यायोग्य लोकांना सर्व दृष्टीने परिपूर्ण करून एक उत्तम समाजसेवक बनवले तर कार्यकर्ते आणि समाज, दोघांचाही फायदा आहे. आणि केवळ मदतीचा आहे आहे म्हणून हात पसरत राहायचे हि वृत्ती सोडून लोकांनीही स्वतः काहीतरी धडपड केली पाहिजे. नाहीतर कार्यकर्ते येतील अन जातील, पण याचक मात्र दानासाठी पसरलेल्या आपल्या कंगाल हातानी ओरबाडून समाजाला वरदान असणार्या कार्यकर्त्यांना संपवतील.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी