महामाया

रात्रीचे बारा वाजले होते. शक्य तितका कमी आवाज करत मी आपल्या घराचं दार उघडलं आणि चोरासारखा दबक्या पावलांनी आत शिरलो; इकडे तिकडे न बघता तडक आपल्या खोलीत धूम ठोकली आणि दार लावून घेतलं. समोरच्या आरशात दिसणारा स्वतःचा अवतार मला पाहवत नव्हता. केस विस्कटलेले, डोळे तणावानं लाल झालेले, चेहरा भीती आणि चिंतेनं पांढराफटक पडलेला. “ या महामायेच्या आ...” मी एक जोरदार शिवी हासडली. त्या बिलंदर मुलीच्या भूलथापांना बळी पडल्यामुळे माझ्यावर हि परिस्थिती ओढवली होती. जिच्यामुळे हि परिस्थिती निर्माण झाली होती, ती मुलगी मात्र माझ्या घरापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या अलिशान बंगल्यात शांतपणे डुलक्या घेत होती.

ज्युलिअन असांज आणि एडवर्ड स्नोडननं जशी सीआयए डायरेक्टरची झोप उडवली होती, अगदी तशीच गंभीर डोकेदुखी या मुलीच्या कारवाया माझ्यासाठी निर्माण करतात. तिच्या भानगडी निस्तरून निस्तरून संशयास्पद प्रकरणं दडपण्यात मी आता चांगला वस्ताद झालो आहे. पण यावेळची भानगड मात्र वेगळी होती. माझ्या पदरात थोडे थोडके नव्हे तर चाळीस हजार रुपये पडले होते. ते कसे आले हे जर माझ्या पापभिरू पालकांना कळलं असतं तर त्यांनी मला सोलून काढलं असतं. ते पैसे लपवायला काही जागा शोधण आता मला भाग होतं.
खरं तर हा उन्हाळ्याच्या सुटीत एक साधा डीप सी क्रुझवर जायचा प्लान होता, पण या मुलीचं व्यक्तिमत्वच इतकं वादळी आहे कि परिस्थिती हाताबाहेर गेलीच पाहिजे. सरस्वतीची संपूर्ण कृपा असलेल्या या मुलीची खरी ताकद म्हणजे तिचं विविध भाषांवारच प्रभुत्व आणि बिनदिक्कत वाट्टेल त्या थापा मारण्याचं कसब. तिच्या बहुभाषिकतेमुळे ती हवे तसे हवे तिथे आपले रंग बदलू शकते. ज्या प्रदेशात फिरते आहे तिथलीच असल्याची अगदी बेमालूम बतावणी ती अनेक वेळा करते. अशी मायावी मुलगी असल्यामुळेच आम्हा मित्रांमध्ये तिचं नाव पडलं आहे महामाया.

तिला नेमक्या किती भाषा येतात हे अजून मलाही नीटसं माहित नाही. त्या क्रुझवर त्याविषयी मला अजून एक शोध लागला.
“तुला स्पेनिश येतं?” त्या जहाजावरील मेक्सिकन खालाशांशी तिला अस्खलित स्पेनिश बोलताना पाहून मी विचारलं.
“सी. (होय). म्हणून तर मी क्रुझसाठी हे जहाज निवडलं....मार्साला सुपिरीओर पुर फावोर...” फर्ड्या स्पेनिशमध्ये तिनं एक वाईन ऑर्डर केली.
जहाजाच्या डेकवर रेलून उभी असलेली तेवीस वर्षीय महामाया एक सुंदर, प्रमाणबद्ध स्टाइल आयकॉनच वाटत होती. तिचा निळा ट्युनिक आणि लांबसडक काळेभोर केस तिबेटी प्रार्थना-ध्वजांसारखे वाऱ्याबरोबर हेलकावे खात होते. पितळेसारखी सावळी, तांबूस त्वचा उन्हात भरपूर उनाडल्यामुळे आणखीन रापली होती. कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशन कोर्स साठी सर्वे आणि डॉक्युमेंटरी फिल्म्स करत फिरल्याचा तो परिणाम होता.
आता एका छोट्याशा कंपनीत पोर्तुगीज-इंग्लिश ट्रान्सलेटरच्या एका जागी बसून राहायच्या नोकरीत हि चंचल छोकरी अडकली आहे. मात्र वाट फुटेल तिथे फिरून नवनवीन गोष्टी बघायची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नाही. तिचं असीम कुतुहल, भीतीचा संपूर्ण अभाव आणि मागचा पुढचा विचार न करता सरळ काहीही करून सोडायची सवय यामुळे महामाया अधून मधून अडचणीत सापडत असते.
“ बाकी, कसं चाललंय तुझं थ्रिलिंग पुस्तकी जीवन?” हलकेच वाईनचे घुटके घेत महामाया एका सन लाऊनजरवर पहुडली.
“मी आपल्या आगामी पुस्तकासाठी एक कथा लिहायच्या विचारात आहे.” मी म्हणालो. “मला फक्त गोष्टीसाठी काही रंगीबेरंगी पात्रं हवीत.”
“ओह. मग कुठे शोधणारेस तू असे इंटरेस्टिंग लोक?”
“बघू. विचार करू.”
“अरे, मला माहितीये कुठे असतात असे अवलिया टाईपचे लोक!” महामायेनं वाईन संपवून आपला ग्लास खाली ठेवला. “असे लोक डिस्को आणि कसीनोमध्ये असतात.” तिचे डोळे एकदम आनंदानं चमकले. “ या जहाजावर आहे कसिनो! चल, आपण जाऊन बघू. ”
“कसिनो?”  मी दचकलो. आपल्यासारख्या सभ्य लोकांनी जाण्याची ती जागा नव्हे हे माझ्या डोक्यात पक्कं बसलं आहे.
“बाई, त्या जागेत मी आयुष्यात कधी पाय ठेवला नाही.”
“मी पण नाही गेले कधी. म्हणून तर म्हणते, चल, जाऊन बघू तरी काय प्रकार असतो ते!”
नवीन कल्पना डोक्यात आल्याबरोबर माझा होकार गृहीतच धरून ती सरळ कासिनोच्या दिशेनं चालायला लागली. आता मी जर तिच्या मागे गेलो नसतो तर तिनं आपल्या मधाळ वाणीत असंख्य विनवण्या करून मला जेरीला आणलं असतं.
पुढच्याच क्षणी आम्ही त्या जुगार अड्याच्या दरवाजापाशी उभे होतो. मात्र कासिनोसाठी असलेला ९०० रुपये एवढा प्रचंड प्रवेश शुल्क बघून मी हुश्श केलं.
“ सॉरी मायबाई, आज जुगार नाहीये तुमच्या नशिबात.”
“ अरे, एवढ्या लवकर काय हातपाय गाळून बसतोस तू? बघ, मी काहीतरी करते आता.” महामाया हर मानायला तयार नव्हती.
“ एस ला कूता ‘दे एन्स्क्रिसिओन पारा लोस स्युदादानोस मेहीकानोस तम्बिएन?” तिनं डेस्कवरच्या रिसेप्शनिस्टला विचारलं.
हा प्रवेश शुल्क मेक्सिकन नागरिकांना पण लागू होतो का?
“सिन्योरिता,” त्या माणसाच्या भुवया उंचावल्या “उस्तेद एस आं मेहीकाना?”
मेडम, तुम्ही मेक्सिकन आहात का?
“तेंगो फामिलीअरेस आं मेहिको.”
अगदी मक्सिकन प्रादेशिक हेलांसाहित शुध्द स्पेनिशमध्ये महामायेनं ठोकून दिलं
माझी फेमिली आहे मेक्सिकोमध्ये! माझा बाप भारतीय आणि आई मेक्सिकन असून माझा मामा मेक्सिकोत असतो.
“असं?” त्या माणसाचं कुतूहल चालवलं. “मूळचे कुठले तुम्ही?”
“युकातान.”
“अरे व्वा!” रिसेप्शनिस्टची कळी खुलली.
तो स्वतः पण त्याच प्रदेशातला होता. आपल्या गावच्या सुंदरीला कासिनोत मोफत प्रवेश द्यायला त्याची काहीच हरकत नव्हती. “आणि या माझ्या मित्राला गेमिंग आर्केडचं तिकीट देता का?” कासिनोत जाण्याविषयी माझी अस्वस्थता बघून तिनं एका क्षणात मला बाजूला काढलं. मी चुकून तिचा बनाव उघड करीन अशी भीती तिला वाटत असावी.
असो.
मी तिथेच गेमिंग आर्केडमध्ये वर्च्युअल गाड्या आणि स्पीडबोट चालवत चांगला दोन तास मस्त टाईमपास केला. पण महामाया आसपास असली तर कोणत्याही माणसाची शांती फार वेळ टिकत नाही.
थोड्याच वेळात माझा मोबाईल वाजला.
“जे जे! भानगड झाली रे!” महामाया पलीकडून ओरडत होती.
“काय झालं. सगळे पैसे हरलीस कि काय?”
“जिंकले मी!”
“मग?”
“नव्वद हजार रुपये आलेत आता माझ्याकडे.”
“अरे बापरे.” तिची अडचण माझ्या लगेच लक्षात आली. बापाकडून केवळ दहा हजार रुपये उसने  घेऊन महामाया  या ट्रीपवर आली होती. आता हे जास्तीचे पैसे कुठे दडपायचे?

“तू आधी त्या जुगार अड्यातून बाहेर पड. मग आपण विचार करू त्या पैशाचा.”

“हो का?” माझ्या मागूनच महामायेचा आवाज आला. “तू घाबरलास कि फार क्युट दिसतोस.” ती मिश्किलपणे म्हणाली. आम्ही गेमिंग अर्केद्मधून बाहेर पडून लॉबीच्या दिशेने चालू लागलो.

“मी सगळी रक्कम हजारच्या नोटांमध्ये घेतली आहे. आपण आरामात वासलात लावू शकतो या पैशांची.”

महामायेनं आपल्या रकसेक मधून एक विमानात उलटी आल्यावर देतात ती एअर सिकनेस बेग काढली आणि सगळ्या नोटा त्याच्यात कोंबल्या. “या बेगला हात लावायची हिम्मत कोणीही करणार नाही.”
या मुलीला गरजेपेक्षा खूप जास्त बुध्दी आणि ज्ञान आहे. त्यामुळे असे विचित्र प्रसंग उद्भवतात कि माणसाला हसावं कि रडावं काळात नाही. एकीकडे ती या सगळ्या भानगडी करत असतानाच मागून एक उंच आडदांड माणूस आला.

“हाय माया! अगं तू कुठे अदृश्य झालीस मध्येच?”
ओह, हाय एनथनी!  महामायेच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं.
“लई भारी नाचतेस तू” तो माणूस महामायेवर फिदा झालेला दिसत होता. “तू मला तुझा पत्ता देत होतीस.”
“अरे हो! जरूर, घे लिहून.
पहिला मजला,
दयानंद स्मृती बिल्डींग,
स्वामी विवेकानंद रोड,
पणजी गोवा
४०३-००१

मग ये पुढच्या वेळी गोव्यात आलास की. भेटू आपण.” मायनं तोंड भरून आमंत्रण दिलं.

तो माणूस आनंदाने हवेत उडताच निघून गेला.

“कोण होता तो?”

“काय माहित. होता कोणतरी एनथनी फर्नांडीस. मला इथल्या डिस्कोत भेटला. फार बोलघेवडा माणूस.”

“तू त्याला बिनदिक्कत गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीचा पत्ता दिलास?”

“काय करणार. असल्या आगाऊ लोकांना असंच दूर ठेवावं लागतं” मायानं झाली गोष्ट एका फटक्यात उडवून लावली. “चल आता मस्तपैकी जेवू आपण. इटालीची प्रसिध्द चीआंटी वाईन टेस्ट करून बघायची आहे मला. आता काय, भरपूर पैसे आहेत आपल्याकडे.” ती एअर सिकनेस बेग मुठीत धरून महामाया रेस्टोरंटच्या दिशेने चालू लागली.

त्या रात्री महामाया उत्तम इटालियन वाईनच्या साथीने चारी ठाव जेवली. परत आल्यावर तिथे काढलेले फोटो काही मासिकं आणि वृत्तपत्रांना विकून तिनं अजून चार-पाच हजार रुपये कमावले. तिनं जिंकलेल्या नव्वद हजारातले चाळीस  हजार मला देऊन टाकले. मी एक दिवस गुपचूप एका छोट्याशा बँकेत खातं उघडून ते पैसे सुरक्षित ठेऊन दिले.

या मुलीच्या नादी लागलो तर मी एकतर तुरुंगात तरी जाईन किंवा हिच्या वेड्या सहसांवर कथा लिहून मोठा लेखक तरी होईन. तिच्या स्वच्छंदी जीवनाचा आणि बिनधास्त व्यक्तिमत्वाचा मात्र मला खूप हेवा वाटतो.
देश-विदेशातल्या उत्तमोत्तम गोष्टी बघत महामाया खूप रसिकतेनं जीवन जगते. मात्र तिला गरजेपेक्षा खूप जास्त माहिती असल्या मुळे ती मागेपुढे न बघता वाट्टेल ते साहस करते. आपला स्वातंत्र बाणा जपण्यासाठी ती सरळ खोट्यानाट्या थापांचं जाळं विणते. आज, आत्ता, या क्षणापुरतं जगणारी ही मुलगी आपल्या कर्मांचा पुढे काय परिणाम होईल याचा जराही विचार करत नाही. उलट जर कोणी तिला खोटं बोलणं थांवण्याचा सल्ला दिला तर त्या व्यक्तीच्या दिशेने एक जळजळीत कटाक्ष टाकत महामाया एक सुंदर वचन उद्धृत करते.
“माणसाने केव्हाही अती प्रामाणिक असू नये. सरळ झाडे सर्वात आधी कापली जातात. प्रामाणिक माणसे सर्वात आधी भरडली जातात.”- आर्य चाणक्य.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी