आजचे तरुण वाचतात का?

आपणा सर्वाना वाचक दिनाच्या शुभेच्छा. आज वाचन आणि पुस्तके यावर बर्याच चर्चा झडत असतील. आजच्या तरुणांचे वाचन कमी झाले आहे का? हा प्रश्न आज चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
“आजचे तरुण कमी वाचतात” हे विधानच मुळात चुकीचे आहे. इन्टरनेट वर उपलब्ध असलेली मुबलक माहिती आजचे तरुण कायम वाचत असतात. तसेच ब्लॉग, कंटेंट वेबसाईट, अशा  प्लेटफोर्मवरती लेखक व वाचक प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. आता पुस्तक हि त्यांची पहिली पसंती का नाही हा प्रश्न आहे. याचे कारण गेल्या काही वर्षात करमणुकीची अनेक साधने निर्माण झाली आहेत. व्हिडीओ गेम्स, संगीत, चित्रपट, इन्टरनेट, अशा अनेक गोष्टी आज आपले लक्ष आणि वेळ घेण्यासाठी स्पर्धा करतायत. पण त्यातही चेतन भगत सारखा मनुष्य तुफान लोकप्रिय आहे, अब्दुल कलमांची पुस्तके लाखो तरुणांना स्फूर्ती देत आहेत, शिवा ट्रिलॉजि सारखी नवी पुस्तके हातोहात खपत आहेत म्हणजेच वाचन संस्कृती टिकून आहे.


हिंदुस्तान टाईम्स ने २०१३ मध्ये भारताच्या विविध महानगरांमधील ९८६ तरुण-तरुणींच्या केलेल्या एका पाहणीनुसार शहरी तरुणामधले साधारण ४२ टक्के लोक फिक्शन, २८ टक्के इतिहास आणि जागतिक घडामोडी, तर २१ टक्के लोक प्रवासवर्णन आणि चरित्रे वाचतात. आणि एकूण वाचाकांमाधले ४६ टक्के लोक वाचनात सरासरी एक ते पाच तास खर्च करतात. (१)

उगाचच देशभरातली आकडेवारी देऊन मी तुमचा डोळ्यात धूळफेक करतोय असे तुम्हाला वाटत असेल तर आपण आपल्या गोव्यातलीच काही आकडेवारी पाहू. पणजीच्या केंद्रीय वाचनालयाचे क्युरेटर श्री कार्लोस फर्नांडीस यांनी दिलेल्या माहितीनुसार वाचनालयाचे साधारण ६० टक्के सदस्य तरुण आहेत तर २१ टक्के वयस्क आहेत. दहा वर्षापूर्वी हे वाचनालय एका दिवसाला ७०-८० पुस्तके इश्यू करत असे पण आता हा आकडा ५०० झाला आहे. आपल्या वाचनालयाला दररोज १००० लोक भेट देतात. तरुणांचा सर्वाधिक कल कादंबऱ्यांकडे असून त्यापाठोपाठ संदर्भ ग्रंथाना वाचकांची पसंती आहे. अर्थात केवळ एका वाचनालयातली आकडेवारी तरुणांच्या वाचन संस्कृतीचा पुरावा होऊ शकत नाही.

आज वाचनालये, पुस्तक विक्रेते, साहित्य संमेलने येथील उपस्थिती पाहून काही लोक वाचन कमी झाले आहे का वाढले आहे याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतात. पण खरी गरज आहे ती वाढत्या ओन्लाईन पुस्तक खरेदीकडे पाहण्याची. अमेरिका व युरोप मध्ये तर इ-बुक्स आणि हार्ड-कॉपी पुस्तक खरेदीचे प्रमाण ५०-५० झाले आहे. भारतात इ-बुक्स चा बाजारपेठेतील हिस्सा साधारण १० टक्के च्या आसपास आहे. २०२० पर्यंत हा आकडा २५ टाक्यांवर जाण्याचा अंदाज आहे. जर्मनीस्थित ए.सी. निल्सन संस्थेने २०१५ भारतातील मध्ये २००० शहरी तरुणांची पाहणी केली त्यातील ५६ टक्के लोकांनी कमीत कमी एक इ-बुक विकत घेतले होते. त्याचप्रमाणे शहरी भागात ५४ टक्के भारतीय तरुण आता पुस्तक वाचनासाठी मोबाईलचा वापर करतात असे आढळून आले. (२)

तात्पर्य, आजचे तरुण वाचतात. इतकेच नाही तर लॉर्ड ऑफ द रिंग्स, चाणक्य नीती अशा पुस्तकांच्या टिकून असलेल्या लोकप्रीयतेवरून कळावे कि दर्जेदार पुस्तके वाचतात. बाकी आज तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या बाहुबली चित्रपटाच्या प्रोमोशनचा भाग म्हणून निर्मात्यांना “द राईज ऑफ सिवगामी” नामक पुस्तक काढावेसे वाटले यातच सारे काही आले.
...................................

संदर्भ:
१ Food for thought: What’s young India reading and why? Hindustan Times, 4 August 2013.
http://www.hindustantimes.com/books/food-for-thought-what-s-young-india-reading-and-why/story-MNfDT6Etby1tbFqrIsKLLK.html

२ Digital Book World: The new era of e-books in India
http://www.digitalbookworld.com/2016/the-new-era-of-ebooks-in-india/

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी